Thursday, May 15, 2025
Homeब्लॉगIndian Penal Code : हुंडा प्रतिबंध कायदा 1961

Indian Penal Code : हुंडा प्रतिबंध कायदा 1961

परंपरेतून आलेल्या काही अनिष्ठ रूढी आजही समाजात आहेत. हुंडा हे त्याचे ज्वलंत उदाहरण. आजही आपण हुंड्यापायी नववधूंच्या छळाच्या, बळीच्या घटना ऐकतो-वाचतो. या अनिष्ठ प्रथेचे निर्मूलन करणे म्हणजे प्रचलित रुढी, परंपरेविरुध्द जनजगृतीची एक प्रकारची लढाईच आहे.

- Advertisement -

हुंडा पध्दती ही आपण पुरुष महिला समानतेचा जो नारा देत आहोत त्याच्याशी विसंगतच आहे. त्यातूनच स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीला समाजात असणारी किंमत या विषयी समाजाची मानसिकता काय आहे हे कळून येते. हुंडा पध्दतीचे निर्मूलन म्हणजे ही मानसिकता बदलण्याचे मोठे आव्हान सर्व समाजापुढे आहे. हुंडा पध्दतीविषयी जी मानसिकता समाजात आहे ती बदलणे तरुणांच्या व युवा शक्तीच्या हाती आहे. त्यासाठी समाजामध्ये हुंडा विरोधीचे चर्चासत्र, चित्रस्पर्धा, व्यंग चित्रस्पर्धा, प्रदर्शने, आत्मकथन, लघुपट, स्लाईड शो, प्रश्नमंजुषा इत्यादी कार्यक्रमाव्दारे जनजागृती घडवून आणता येणे शक्य आहे.

हुंडा देणे व घेणे ही परंपरेने अस्तित्वात असलेली अनिष्ठ प्रथा आहे. हुंड्यापायी छळ होवून अनेक युवतींना वैवाहिक जीवनातून बाहेर पडावे लागत आहे व समाजात अनेक अडचणींना तोंड देत जीवन जगावे लागत आहे. या पध्दतीमुळे कुटुंबाची दुर्दशा होणे, मुले मातेच्या प्रेमापासून परकी होणे व वैवाहिक जीवनातून बाहेर पडलेल्या युवतींचा प्रश्नही निर्माण होतो. या सर्व समस्यांवर वचक बसावा म्हणून सरकारने हुंडा बंदी कायदा तयार केला आहे.

कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण कायदा 2005

हुंडयाची व्याख्या – हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961 या अधिनियमातील कलम 2 अन्वये हुंडा या शब्दाची व्याख्या विवाहातील एका पक्षाने विवाहातील अन्य पक्षास किंवा विवाहातील कोणत्याही पक्षाच्या आई-वडिलांना अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीने किंवा तत्पूर्वी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा द्यावयाचे कबूल केलेली कोणतीही संपती अथवा मूल्यवान रोख असा आहे. परंतू त्यामध्ये ज्या व्यक्तींना मुस्लिम व्यक्तिगत कायदा (शरीअत) लागू आहे त्या व्यक्तींच्याबाबतीत दहेज किंवा मेहर यांचा समावेश होत नाही.

कायदेशीर तरतूद – हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल शिक्षा-हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 च्या कलम 3 अन्वये हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल कमीत कमी 5 वर्षे इतक्या मुदतीची कारावासाची आणि कमीत कमी 15,000 रुपये अथवा अशा हुंडयाच्या मूल्याइतकी रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल इतक्या रकमेची दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.

हुंडा मागण्याबद्दल शिक्षा – हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961 च्या कलम 4 अन्वये कोणत्याही व्यक्तीने हुंडा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मागितल्यास त्यास कमीत कमी 6 महिने परंतू 2 वषापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची आणि 10,000 रुपयांपर्यत दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.

जाहिरात बंदी – हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961 च्या कलम 4 अ अन्वये कोणत्याही व्यक्तींने हुंडया संदर्भात जाहिरात छापल्यास किंवा प्रसिध्द केल्यास कमीत कमी 6 महिने परंतू 5 वर्षापर्यत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची किंवा रुपये 15,000 रुपयापर्यंत दंडाची दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.

उद्देश – हुंडा बळींची वाढती संख्या, पती किंवा पतीच्या नातेवाईकांकडून क्रूर/छळाची वागणूक मिळाल्याने स्त्रीची आत्महत्या किंवा खून झाल्याची कित्येक प्रकरणे आहेत आणि म्हणूनच फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय दंड संहिता व भारतीय साक्ष अधिनियमातही ( Criminal Procedure Code, Indian Penal Code and Indian Evidence Act ) आवश्यक त्या सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले आहे ते असे –

– पतीने किंवा पतीच्या नातेवाईकाने स्त्रीला क्रूर/छळाची वागणूक दिल्यास, अशा कृत्याच्या शिक्षेस किंवा दंडास पात्र ठरविण्याकरिता भारतीय दंड संहितेत सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत. अशा अपराधाला बळी पडलेल्या स्त्री/तिच्या नातेवाईकाने राज्य शासनाने प्राधिकार दिलेल्या कोणत्याही लोकसेवकाने पोलीस ठाण्यात कळविल्यास तो अपराध दखल योग्य असेल.

– एखाद्या स्त्रीचा विवाह झाल्यापासून सात वर्षार्ंच्या आत मृत्यू झाला असेल आणि अशा मृत्यूचा रास्त संशय असेल तर कार्यकारी दंडाधिकार्‍यांकडून मृत्यूची चौकशी व शव परिक्षेची तरतूद करण्यात येत आहे.

– एखाद्या स्त्रीने विवाह झाल्यापासून सात वर्षांच्या आत आत्महत्या केली असेल आणि तिच्या पतीने/नातेवाईकाने क्रूरपणे वागविले असे सिध्द केले असेल तर तिला आत्महत्येस प्रवृत केले असे गृहित धरता येईल.

शेवटी एवढंच सांगणे आहे की, हुंडा प्रथा बंद करणे ही काळाची गरज आहे. समाजातील ही अनिष्ट रूढीला लगाम लागायलाच हवा.

– अ‍ॅड. प्रियंका देठे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी घसरली ; सुरत-भुसावळ रेल्वे वाहतूक विस्कळीत

0
जळगाव - jalgaon अमळनेर रेल्वे स्टेशनजवळ (Railway station) आज दि.१५ रोजी दुपारच्या सुमारास मालगाडीचे डबे रूळावरून घसरल्याने अपघात (Accident) घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली...