Friday, January 23, 2026
Homeदेश विदेशIRCTC News : रेल्वे प्रवासाचे नियोजन आता होणार सोपे; १० तास आधीच...

IRCTC News : रेल्वे प्रवासाचे नियोजन आता होणार सोपे; १० तास आधीच मिळणार तिकीट स्टेटसची माहिती

दिल्ली । Delhi

भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी रेल्वे मंत्रालयाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवासाच्या वेळी तिकीट कन्फर्म होणार की नाही, या चिंतेत असलेल्या प्रवाशांची अडचण ओळखून रेल्वेने ‘रिझर्व्हेशन चार्ट’ तयार करण्याच्या नियमावलीत आणि वेळेत मोठे बदल केले आहेत.

- Advertisement -

नव्या नियमांमुळे प्रवाशांना आता आपल्या प्रवासाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येणार आहे. पूर्वी रेल्वेचा पहिला आरक्षण चार्ट गाडी सुटण्याच्या साधारण ४ तास आधी तयार केला जात असे. मात्र, यामुळे प्रवाशांची मोठी धावपळ होत असे. आता रेल्वेने गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेनुसार तीन मुख्य विभागांत चार्ट तयार करण्याचे नवीन वेळापत्रक निश्चित केले आहे:

YouTube video player

सकाळच्या गाड्या (सकाळी ५:०१ ते दुपारी २:००): जर तुमची ट्रेन सकाळी ५ ते दुपारी २ या वेळेत सुटणार असेल, तर तिचा पहिला आरक्षण चार्ट आता आदल्या दिवशी रात्री ८:०० वाजेपर्यंतच तयार केला जाईल. यामुळे प्रवाशांना रात्री झोपण्यापूर्वीच आपले तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही, हे स्पष्ट होईल.

दुपार आणि रात्रीच्या गाड्या (दुपारी २:०१ ते रात्री ११:५९): दुपारी २ नंतर आणि मध्यरात्रीपूर्वी सुटणाऱ्या गाड्यांचा चार्ट आता निर्धारित वेळेच्या बराच आधी तयार केला जाईल. प्रवाशांना किमान ४ ते ६ तास आधी माहिती मिळेल, याची खबरदारी रेल्वे घेणार आहे.

मध्यरात्रीच्या गाड्या (रात्री १२:०० ते पहाटे ५:००): या गाड्यांचा चार्ट आता गाडी सुटण्यापूर्वी किमान १० तास आधी तयार केला जाईल. उदाहरणार्थ, जर तुमची गाडी मध्यरात्री २ वाजता असेल, तर आदल्या दिवशी संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच तुम्हाला तिकीट स्टेटस समजणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या मते, अनेक प्रवासी रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर त्यांना तिकीट कन्फर्म नसल्याचे समजते, ज्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. चार्ट लवकर तयार झाल्यामुळे प्रवाशांना तिकीट कन्फर्म न झाल्यास पर्यायी प्रवासाची व्यवस्था (बॅकअप प्लॅन) करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

सध्या रेल्वेची साधारण ८७ टक्के तिकिटे IRCTC च्या माध्यमातून ऑनलाइन बुक केली जातात. नियमानुसार, ऑनलाइन वेटिंग तिकीट चार्ट तयार होईपर्यंत कन्फर्म झाले नाही, तर ते आपोआप रद्द होते. नवीन नियमांमुळे चार्ट लवकर तयार होणार असल्याने, प्रवाशांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात परत मिळण्याची (Refund) प्रक्रिया देखील अधिक लवकर सुरू होण्यास मदत होईल.

रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे वेटिंग लिस्ट आणि आरएसी (RAC) तिकीट असलेल्या प्रवाशांना मोठा आधार मिळाला आहे. गाड्या सुटण्यापूर्वीच निश्चित माहिती हाती आल्याने रेल्वे स्थानकांवरील गर्दी आणि गोंधळ कमी होण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...