दिल्ली | Delhi
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर देशभरात विमान प्रवासासंबंधी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असतानाच, सोमवारी इंदूर विमानतळावर इंडिगोच्या फ्लाइट 6E 6332 या विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. या घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सोमवारी सकाळी 9 वाजता इंदूरहून भुवनेश्वरकडे निघालेलं इंडिगोचं विमान उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच पायलटला विमानामध्ये तांत्रिक अडचण जाणवली. यानंतर तात्काळ निर्णय घेत पायलटने एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) शी संपर्क साधून आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. प्रशासनाच्या सहकार्याने विमान पुन्हा धावपट्टीवर सुरक्षित उतरवण्यात आलं.
विमानात एकूण किती प्रवासी होते याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली, तरी सोशल मीडियावर काही प्रवाशांनी व्हिडिओ शेअर करत विमानातील क्षणचित्रं उलगडली आहेत. टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमान परतल्यामुळे सुरुवातीला अनेक प्रवासी गोंधळात सापडले होते, मात्र नंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचं स्पष्ट झालं.
या संदर्भात माहिती देताना इंदूर विमानतळाचे संचालक विपिनकांत सेठ म्हणाले, “इंडिगोच्या भुवनेश्वर जाणाऱ्या फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड आढळल्याने पायलटने खबरदारीचा उपाय म्हणून आपत्कालीन लँडिंग केलं. ही पूर्णपणे सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेली सावधगिरीची कारवाई होती. सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असून, त्यांना कोणतीही शारीरिक हानी झालेली नाही.” ते पुढे म्हणाले, “ही घटना अतिशय सामान्य असून, वैमानिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा धोका टळला. आता इंडिगो एअरलाइन्सकडून या तांत्रिक बिघाडासंदर्भात सविस्तर माहिती घेतली जात आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.”
गेल्या काही दिवसांपासून देशभरात विविध विमान कंपन्यांच्या उड्डाणांदरम्यान तांत्रिक बिघाडाच्या घटना समोर येत आहेत. यामागचं प्रमुख कारण म्हणजे अहमदाबादमध्ये घडलेली गंभीर विमान दुर्घटना. एअर इंडियाच्या AI-171 या फ्लाइटचा अपघात होऊन त्यात १७५ हुन अधीक प्रवासी आणि कर्मचारी मृत्युमुखी पडले. ही दुर्घटना घडल्यानंतर भारतासह जगभरात विमान वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक दक्षता बाळगली जात आहे. प्रत्येक तांत्रिक त्रुटीकडे गांभीर्याने पाहिले जात असून, लहानशा बिघाडावरही वैमानिकांकडून तत्काळ कारवाई केली जाते आहे.





