संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यात निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातील पाण्याचा वाद चिघळला असून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईने शेतकर्यांमध्ये प्रचंड संताप पसरला असून, आम्हालाही सहआरोपी करा, अशी मागणी करत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सध्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू आहे. जलसंपदा विभागाने कालव्यातील अनधिकृत पाईप काढण्यास सुरुवात केली असता, शेतकर्यांनी याला तीव्र विरोध केला. इंद्रजीत थोरात यांनी शेतकर्यांचे नेतृत्व करत प्रशासनाच्या कारवाईला आव्हान दिले. जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रमोद माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निमगाव पागा ते खळी पिंपरी दरम्यान अनधिकृत पाईप काढताना इंद्रजीत थोरात यांनी अटकाव केला. त्यांनी आमच्या कारखान्याने पाईप टाकले आहेत ते काढू नका. शेतकर्यांच्या जमिनी कालव्यासाठी गेल्या त्यांना आधी पाणी द्या, असे सांगितले. तरी देखील यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशासन आणि शेतकर्यांमधील तणाव कसा निवळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकर्यांचा उद्रेक..
गुन्हा दाखल झाल्याने शेतकर्यांचा संताप अनावर झाला आहे. प्रशासन नियोजन करत नाही, हक्काचे पाणी उपसू देत नाही आणि उलट खोटे गुन्हे दाखल करतात हा अन्याय आहे. इंद्रजीत थोरात यांच्यासोबत आम्हांलाही सहआरोपी करा, अशी संतप्त भावना शेतकर्यांनी व्यक्त केली. प्रशासनाने योग्य पर्याय काढला नाही तर आंदोलनाशिवाय आमच्याकडेही उपाय नाही.
– रामेश्वर पानसरे (शेतकरी-जाखुरी)
मग गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून ?
काल सायंकाळी प्रशासन, इंद्रजीत थोरात थोरात आणि शेतकर्यांमध्ये सामोपचाराने तोडगा निघाला होता. प्रशासनानेही तो मान्य केला होता. मग आता गुन्हा दाखल का झाला? हे संगमनेरला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र आहे. गुन्हे दाखल करायचे असतील तर आमच्यावरही करा.
– अण्णा राहिंज (शेतकरी-पिंपरणे)
शेतकर्यांसाठी लढणे गुन्हा आहे का ?
जलसंपदा विभागाने यापूर्वीही शेतकर्यांची फसवणूक केली आहे. संगमनेर तालुक्याचे 48 किलोमीटर लाभक्षेत्र असताना पाण्याबाबत अपेक्षित हमी दिली जात नाही, दिलेला शब्द पाळला जात नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी लढणे गुन्हा आहे का? आम्ही यापुढेही शेतकर्यांसाठी लढत राहू.
– इंद्रजीत थोरात (संचालक-थोरात कारखाना)