मुंबई । प्रतिनिधी
पुणे येथील हिंजेवाडीतील आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर स्थलांतर झालेल्या नाहीत. या कंपन्या अगोदरच स्थलांतरीत झालेल्या असून त्या महाराष्ट्रातच आहेत. काही कंपन्या पुण्याजवळच स्थलांतरीत झालेल्या आहेत. त्यामुळे आयटी कंपन्यांच्या स्थलांतरावरुन राजकारण करत विरोधकांनी महाराष्ट्राला बदनाम करू नये. या बदनामीमुळे उद्योजकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, अशा शब्दात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना फटकारले आहे.
वाहतुक कोंडीला कंटाळून हिंजेवाडीतील ३७ आयटी कंपन्यांनी महाराष्ट्राबाहेर स्थलांतर झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. यासंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधला होता. त्यापार्श्वभूमिवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत विरोधकांचा आरोप फेटाळून लावला. शिवाय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उद्योग विभागाने आणलेल्या परदेशी गुंतवणूकीची माहिती देतानाच महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळातील परदेशी गुंतवणूकीवरून विरोधकांनाच लक्ष्य केले. हिंजेवाडीतील आयटी कंपन्या वाहतुक कोंडीमुळे स्थलांतर झालेल्या नाहीत. त्या यापूर्वीच स्थलांतर झाल्या त्या राज्य सोडून गेलेल्या नाहीत. त्या पुण्याजवळच्या भागातच आहेत, असे सांगत महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात १३ कंपन्या स्थलांतर झाल्या होत्या, अशी माहिती सामंत यांनी दिली. त्यामुळे आता जे गैरसमज पसरवत आहेत, एमआयडीसीला बदनाम करीत आहेत, त्यांनी माहिती घेऊन खुलासा करावा, अशी मागणीही सामंत यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्य गुजरात आणि कर्नाटक राज्यांच्याही मागे होता. मात्र, राज्यात सत्तांतर होऊन महायुतीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्र हा गेल्या दोन वर्षात उद्योग आणि परदेशी गुंतवणूकीत पहिल्या क्रमांकावर आहे. गुंतवणूकीचे आकडे पाहून सरकार उद्योजकांचे महाराष्ट्रात कशापद्धतीने स्वागत करीत आहे, हे यावरून लक्षात येईल, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. महाविकास आघाडी सरकार असताना २०२२ मध्ये एक शिष्टमंडळ दावोसला गेले होते. त्यावेळी ८० हजार ४९८ कोटींचा करार करण्यात आल्याचे सांगण्यात आला. यामध्ये ५० हजार कोटींचा उर्जा कराराचाही समावेश होता, असे सांगतानाच त्या प्रकल्पाचे काय झाले, तो प्रकल्प कुठे आहे, असा सवाल करतानाच आघाडीच्या सरकारने एकही उद्योग महाराष्ट्रात आणला नसल्याचा आरोप सामंत यांनी केला.
दोन वर्षांत ४ कोटींचे ४२ करार
महायुतीचे सरकार राज्यात आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत ४ लाख कोटींहून अधिक रकमेचे करार करण्यात आले आहेत. जानेवारी २०२३ मध्ये १ लाख ३७ हजार ६६६ कोटींचे १९ तर जानेवारी २०२४ मध्ये ३ लाख २३३ कोटींचे २३ करार करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री सामंत यांनी दिली. या करारामुळे महाराष्ट्रात दोन लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहे, असा दावाही सामंत यांनी केला. त्यामुळे उद्योगांवरून विरोधकांनी राजकारणासाठी नाहक महाराष्ट्राची बदनामी करू नये, त्यामुळे उद्योजकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.