Sunday, January 25, 2026
Homeक्रीडाIndvsAus First ODI: टीम इंडियाच्या फलंदाजांची हाराकिरी; पर्थवरच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव

IndvsAus First ODI: टीम इंडियाच्या फलंदाजांची हाराकिरी; पर्थवरच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पहिल्या सामन्याची सुरवात ही पराभवाने झाली आहे. पर्थच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या सामन्यात एकही गोष्ट भारतीय संघाच्या बाजूने घडली नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना प्रत्येकी २६-२६ षटकांचा खेळवण्यात आला. या कमी षटकांच्या सामन्यात भारतीय फलंदाज पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी करताना दिसले.

पहिल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ९ बाद १३६ धावा केल्या, मात्र डकवर्थ-लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर १३१ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. हे लक्ष्य ऑसीस टीमने सहज पार करत ७ विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

- Advertisement -

भारतीय फलंदाजांकडून निराशाजनक सुरवात
नाणेफेक गमाल्यावर फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. २२३ दिवसांनंतर एकदिवसीय संघात परतलेल्या रोहित शर्माची संघाच्या धावफलकावर १३ धावा असताना विकेट पडली. तो १४ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ८ धावा करत तंबूत परतला. त्याच्या जागी आलेल्या विराट कोहलीला ८ चेंडूचा सामना करून खाते उघडता आले नाही, विराट भोपळा न फोडताच माघारी परतला. कर्णधार शुबमन गिल १० धावा करून परतल्यावर सर्वांच्या नजरा या उप कर्णधार श्रेयस अय्यरवर खिळल्या होत्या. पण तो देखील ११ धावांवर तंबूत परतला. संघ अडचणीत असताना षटके कमी करण्यात आल्यावर अक्षर पटेल आणि के एल राहुल जोडी जमली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी रचली. अक्षर पटेलने ३१ चेंडूत ३१ धावा केल्या. के एल राहुल ३१ चेंडूत ३८ धावा करून परतल्यावर नितीश कुमार रेड्डीने ११ चेंडूत नाबाद १९ धावा करत २६ षटकात भारतीय संघाच्या धावफलकावर १३६ धावा लावल्या.

YouTube video player

मिशेल मार्शची तुफान फटकेबाजी
ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूड, मिचेल ओवेन आणि मॅथ्यू कुहनेमन यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले, तर मिचेल स्टार्क आणि नॅथन एलिस यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. डकवर्थ लुईस नियमानुसार, ऑस्ट्रेलियन संघाला १३१ धावांचे टार्गेट मिळले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना ट्रॅविस हेड आणि ८(५) आणि मॅथ्यू शॉर्ट ८ (१७) स्वस्ता माघारी फिरले. पण त्यानंतर सलामीला बॅटिंगला आलेल्या मिचेल मार्शने आधी जोश फिलिप ३७ (२९) सोबत उत्तम भागीदारी करत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने सेट केला. त्यानंतर मॅथ्यू रॅनशोसोबत २१ (२४)* मॅच संपवूनच तो नाबाद राहिला. मार्शने ५२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४६ धावांची नाबाद खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या