Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधमहागाईला फोडणी

महागाईला फोडणी

गेल्या 25 वर्षांमधली सर्वाधिक महागाई सध्या अनुभवायला मिळत आहे. करोना आणि त्यानंतरचे युक्रेन-रशिया युद्ध सामान्यांचे जगणे अवघड करत आहे. आता इंडोनेशिया, अर्जेंटिनाने घेतलेल्या निर्णयाने पामतेलाच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे. अगोदर सूर्यफूल तेल महागले; आता पामतेल मिळेनासे झाल्यास काय करायचे हा गहन प्रश्न आहे.

देशभरात वाढत्या महागाईने थैमान घातले आहे. आपल्या दररोजच्या वापरात आवश्यक असणार्‍या जवळजवळ सर्वच गोष्टींचे दर वाढले आहेत. खाद्यतेलाचे दर तर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. एकेकाळी पामतेल 20 ते 25 रुपये लिटर या किमतीने मिळत होते. शेंगदाणे तेल सर्वात महागड्या तेलांपैकी एक होते, मात्र आता सर्व चित्रच बदलले आहे. सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या दराने शेंगदाणा तेलाच्या दराला मागे टाकले आहे. आता पामतेल त्याच वाटेने निघाले आहे. सर्वात उच्च प्रतीचे तेल म्हणजे शेंगदाणा आणि करडी तेल तर हलक्या प्रतीचे तेल म्हणजे पाम, सोयाबीन, सरकी. जे गेल्या 40 वर्षांमध्ये घडले नाही ते आता घडत आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून तेलाच्या आयातीवर तसेच निर्यातीवर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. शेंगदाणा तेल 10 रुपयांनी उतरले तर सूर्यफूल तेल 10 रुपयांनी वधारले. सरकी, सोयाबीन तेल नऊ रुपयांनी, पामतेल दहा रुपयांनी वाढल्यामुळे ग्राहक शेंगदाणा तेलाकडे वळला आहे. बाजारामध्ये करडी तेलाची आवक कमी झाली असून भावामध्ये वाढ झाली आहे. करडीच्या तेलाचे दर हे 230 रुपये लिटरवर जाऊन पोहोचले असून सध्या सर्वात महागडे तेल म्हणून या तेलाची ओळख होत आहे. ही स्थिती का ओढवली याचा खोलात जाऊन विचार केला तर युद्ध हेच अनेक बाबतीतले कारण असल्याचे समोर येते.

युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली. सूर्यफुलाचा मोठा उत्पादक असलेला युक्रेन युद्धात अडकल्यामुळे जगभर सूर्यफुलाच्या तेलाचा पुरवठा खंडित झाला. त्यामुळे तेलाचे दर भडकले. भारतासह अनेक देशांना पाम तेलाची निर्यात करणार्‍या इंडोनेशियामध्ये पाम तेलाची टंचाई निर्माण झाली आहे. तिथे तेल खरेदीसाठी दोन-दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत. इंडोनेशियाच्या अध्यक्षांनी पाम तेलाची निर्यात बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे भारतीय बाजारातल्या अनेक मोठ्या कंपन्यांनी तेलसाठा विक्रीला काढणे थांबवले. या पार्श्वभूमीवर भारतात खाद्यतेलाचे दर लिटरमागे एक ते दोन रुपयांनी वाढले असून आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकूण मागणीच्या 68 टक्के तेल भारत आयात करतो. यात इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन देशांमधून पाम तेल तर युक्रेन, रशिया आणि अर्जेंटिना इथून सूर्यफूल तेलाची आयात होते. भारताची एकूण खाद्यतेलाची मागणी दोन कोटी तीस लाख टन आहे. भारत दरवर्षी दीड कोटी टन तेल आयात करतो. त्यापैकी मलेशिया, इंडोनेशियातून 90 लाख टन तर उर्वरित साठ लाख टन तेल रशिया, युक्रेनमधून आयात होते. सूर्यफुलाच्या तेलापैकी युक्रेन 70 टक्के, रशिया 20 टक्के तर अर्जेंटिनातून 10 टक्के आयात होते तर इंडोनेशियातून 65 टक्के आणि मलेशियातून 35 टक्के पाम तेल आयात केले जाते. पाम तेलासाठी आपण इंडोनेशिया, मलेशिया या देशांवर शंभर टक्के अवलंबून आहोत. त्यातही इंडोनेशियाचा वाटा खूप मोठा म्हणजे 65 टक्के आहे. तो पूर्णपणे बंद झाल्याने पर्याय म्हणून मलेशियाकडे पाहिले जात आहे, मात्र तिथले व्यापारीही आता या गंभीर स्थितीचा फायदा घेत दर वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

दुसरी बाब म्हणजे, मलेशियाची तेल निर्यातीची क्षमता खूप कमी असल्याने दरवाढ अटळ आहे. शिवाय मलेशियाही लहरी आहे. पाकिस्तानच्या नादी लागून मागे या देशाने भारताची निर्यात थांबवली होती. इंडोनेशियात तेलाचा पुरवठा स्वस्त आणि भरपूर प्रमाणात झाला की ही बंदी उठवण्याचा विचार केला जाईल, असे इंडोनेशियाच्या अध्यक्षांनी जाहीर केले आहे. एका व्हिडिओ संदेशात राष्ट्राध्यक्ष झोको विडोडो यांनी सांगितले की, देशात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. पाम तेलावर लागलेली बंदी पुढील निर्णयापर्यंत कायम राहील. इंडोनेशियामध्ये पामची शेती मोठ्या प्रमाणावर होते. त्याच्या फळांपासून पाम तेलाचे उत्पादन होते. त्यातूनच खाद्यतेल तयार केले जाते. त्याशिवाय डिटर्जंट, शॅम्पू, टुथपेस्ट, चॉकलेट, लिपस्टिकमध्येही त्याचा वापर होतो. जगाच्या काही भागात जैविक इंधन म्हणूनही पाम तेलाचा वापर होतो. पाम तेलाच्या उत्पादनात इंडोनेशिया हा जगातला सर्वात जास्त निर्यात करणारा देश आहे, मात्र स्थानिक पातळीवर सध्या तेलाचा तुटवडा आहे. ‘नॅसडॅक’च्या वेबसाईटनुसार जानेवारीच्या शेवटच्या दिवसात इंडोनेशियाने पाम तेलाची निर्यात मर्यादित केली होती. मार्चमध्ये त्यावर लागलेली बंदी उठवली होती. आता आंतररराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर वाढती महागाई लक्षात घेता खाद्यपदार्थांचा तुटवडा टाळण्यासाठी अनेक देश आपली पिके वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. इंडोनेशियाचा हा निर्णय याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. पाम तेलाची टंचाई असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेलाच्या किमती वाढल्या आहेत. एका अहवालानुसार, युक्रेन हा सूर्यफुलाच्या तेलाचा सर्वात मोठा उत्पादक आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे या तेलाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. जगाला लागणार्‍या एकूण तेलापैकी 76 टक्के सूर्यफुलाच्या तेलाचा व्यापार काळ्या समुद्रातून होतो, मात्र युक्रेन युद्धामुळे या व्यापारावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. अशात लोकांची आशा सोयाबीन आणि पाम तेलावर होती. खाद्यतेलाचा विचार करायचा झाला तर सोयाबीनच्या तेलाला पाम तेल हा चांगला पर्याय आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये गोडेतेलाचा जगातला सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या अर्जेंटिनाने सोयाबीन तेलावरच्या निर्यातीवर बंदी आणली होती. अर्जेंटिनामधील व्यापारांना हा निर्णय देशहिताचा वाटत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, तेलाच्या निर्यातीवर बंदी आली तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल आणि परकीय गंगाजळीला फटका बसेल. तसेच तेलाची आयात करणारे देश अमेरिका किंवा ब्राझीलकडे वळू शकतात.

वाढत्या महागाईमुळे संयुक्त राष्ट्रांनी सर्व देशांना विनंती केली आहे की, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी किमतीवर नियंत्रण ठेवावे. सध्या चालू असलेल्या युद्धाचा त्यावर परिणाम होऊ देऊ नये आणि व्यापार चालू ठेवावा. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात पाम तेलाच्या विक्रीवर अनेक निर्बंध घातले गेले होते. सरकारने पाम तेलाची किंमत 9300 इंडोनेशियन रुपये प्रतिटन ठेवण्याचा निर्णय घेतला होता. देशात खाद्यतेलाच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यात गेल्या वर्षापासून 40 टक्के वाढ झाली. त्यानंतर व्यापारमंत्री मोहम्मद लुफ्ती यांनी सर्व उत्पादकांना एकूण उत्पादनापैकी 20 टक्के तेल बाजारात विकण्यास सांगितले होते. भारतात पन्नास हजार कोटी रुपयांचे पाम तेल खरेदी केले जाते. इंडोनेशियाच्या ताज्या निर्णयाचा बहुतांश देशांवर वाईट परिणाम होईल. या संकटाचा सामना करण्यासाठी भारताला राजनैतिक मार्गाचा वापर करावा लागेल. एका बातमीनुसार तेलाच्या किमतीत तीन ते पाच हजार रुपये प्रतिटन वाढ होईल. असा फटका सर्वसाधारणपणे सरकार सहन करत नाही. बाजारपेठच त्यासंदर्भात निर्णय घेते आणि ही दरवाढ अलगद ग्राहकवर्गापर्यंत पसरते. आज हेच घडत आहे. पेट्रोल, डिझेल आदी इंधनाचे दर प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. हे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निर्धारित करते आणि त्यात आपले सरकार हस्तक्षेप करत नाही, असे सांगत सरकारने खुष्कीचा मार्ग अवलंबला आहे. उद्या पाम किंवा इतर तेलांबाबतही असेच काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढीव दरांमध्ये आयात न झेपल्याने किंवा जादा पैसे देणे परवडत नसल्याने पाम तेलाचे वापरकर्ते मेटाकुटीला येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या