Tuesday, May 7, 2024
Homeनगरमहागाईचा थेट पोटाला चिमटा

महागाईचा थेट पोटाला चिमटा

वीरगाव |वार्ताहर| Virgav

18 जुलैपासून जीवनावश्यक वस्तुंवर केंद्र सरकारने 5 टक्के जीएसटी लागु केल्यामुळे अगोदरच उसळलेल्या महागाईत अधिक भर पडल्याने मध्यमवर्गीय आणि गरीबांच्या पोटाला चिमटा बसला.चरितार्थासाठी लागणार्‍या सार्‍याच वस्तू महाग झाल्याने आगामी कालखंडातील हिंदू सणांवर महागाईचा झाकोळ असेल.

- Advertisement -

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच वाढलेल्या महागाईचा केंद्रीय अर्थखात्याच्या निर्णयाने अधिक भडका उडाला. 18 जुलैपासून गहू, तांदूळ, डाळी, गूळ, दूध, दही, पनीर इत्यादी अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांवर 5 टक्के जीएसटी लागू झाल्याने रोजच्या जगण्यासाठी या वस्तू खरेदी करणे आवाक्याबाहेर गेले आहे.

गेली दोन वर्षे करोनामुळे सारे उद्योगधंदे ठप्प झाल्याने शहरे कंगाल झालीच शिवाय गावाशिवारातील शेतकरी-शेतमजूर-कामगार यांचेही उत्पन्नाचे सारे स्त्रोत संपून गेले. जग हळूहळू पूर्वपदावर येत असताना शहरे सुरु झाली, शेतशिवारही फुलू लागला. खेड्यापाड्यात अर्थचक्रे फिरू लागली. इंधन दरवाढीने महागाई रोज वाढत असली तरी तिच्याशी दोन हात करणे सुरुच होते. आता मात्र जीवनावश्यक वस्तुंवर नव्याने बसलेल्या जीएसटी बोज्याने वाढलेल्या महागाईने तर ग्रामीण भाग हैराण झाला आहे. पिकलेला शेतशिवारही आता अतिवृष्टीने धुवून नेल्याने निसर्ग आणि शासनकर्ते दोघांच्याही आसूडाचे चांगलेच कोरडे लोकांवर उठत आहेत.

गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्र, विजयादशमी, दिवाळी या सार्‍या हिंदु उत्सवांचा सध्याचा काळ! सरकार कितीही हिंदुत्वाचे गोडवे गात असले तरी महागाईने आगामी उत्सवावर अंधार पसरला आहे. दोन वर्ष मनासारखे सणवार साजरे करता आले नाही. वाढलेल्या महागाईमुळे यावर्षी हर्षोल्हासात सण साजरे करण्याबाबदही मनोभंग झाला आहे.

जीवनावश्यक वस्तुंची सहा महिन्यापुर्वीची आणि आताची खरेदी किंमत यात प्रचंड वाढ झाल्याने गोरगरीबांना या वस्तू खरेदी करणे अवघड झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत प्रत्येक जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीत 50 ते 60 टक्क्यांची वाढ दिसून येते. करोना कालावधीत नोकरी, व्यवसाय, शेती या सर्व क्षेत्राला बसलेला फटका अद्यापही लोकांना सावरता आला नाही. उत्पन्न नसले तरी महागाईशी सामना सुरुच होता त्यात जीएसटीमुळे नव्याने भर पडली.

मोसमी पावसाच्या अतिवृष्टीने सारे शेतशिवार धुवून नेले. शेतात असलेली उभी पिके वाहून गेली, काही शेतात सडली, आता रोख उत्पन्न देणार्‍या दुधधंद्यावरही लंपीचे संकट आले. या सार्‍याचा विलक्षण परिणाम आता हळूहळू जाणवू लागेल. अन्नधान्य, भाजीपाल्याचेही बाजारभाव मर्यादित उत्पन्नामुळे आगामी काळात वाढलेले दिसतील.पशुधनावरील संकटामुळेही दूध उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. आता सारीच महागाई भडकण्याची शक्यता असून दीर्घकाळ याचे परिणाम जाणवतील. सार्‍याच घटकांवर याचा परिणाम होणार असल्याने ऐन दिपोत्सवात गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांच्या अंगणात मात्र महागाईमुळे आनंदाचे दिवे विझलेले दिसतील.

गोरगरिबांवर कर..!

जीएसटीची अंतर्गत रचना पाहिली तर असे लक्षात येते की, सामान्य लोकं वापरतात त्या वस्तूंवर अधिक आणि तुलनेने चैनीच्या वस्तूंसाठी दर कमी आहेत.उदाहरणार्थ जीएसटी लागू व्हायच्या अगोदर व्हँक्युम क्लिनर, टीव्ही, वॉशिंग मशीन यांच्यावर सरासरी 31 टक्के कर होता.आता त्यांच्यावर 18 टक्के जीएसटी आहे. यातून कोणत्या वर्गाचा फायदा झाला हे स्पष्ट आहे. सोन्यावरचा जीएसटी आजही फक्त तीन टक्के म्हणजे गहू-तांदळापेक्षा कमी हे लक्षात घ्यायला हवे. जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी लावून सरकारने गरिबांच्या खिशाला कात्री लावलीच शिवाय त्यांचे जगणेही मुश्कील केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या