Friday, May 3, 2024
Homeधुळेगुन्हेगारांना पोलीस घेणार दत्तक, ठाण्यांवर वॉच

गुन्हेगारांना पोलीस घेणार दत्तक, ठाण्यांवर वॉच

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

उत्तर महाराष्ट्रात गुन्ह्यांची उकल करण्याची प्रमाण जास्त आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांच्या आकडेवारीवर नजर मारली तरी दाखल गुन्हे, तपास आणि अटकेतील आरोपी यातील वस्तूस्थिती सहज लक्षात येवू शकते.

- Advertisement -

यापुढे गुन्हेगार दत्तक योजना राबविण्यात येणार असून प्रत्येक पोलीस ठाण्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येईल अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक प्रतापराव दिघावकर यांनी दिली.

श्री.दिघावकर यांनी या विभागाची सुत्रे हाती घेतल्यानंतर धुळ्यात पहिल्यांदाच त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

गेल्या तीन दिवसांपासून वार्षिक तपासणीच्या निमित्ताने धुळ्यात असलेले श्री.दिघावकर यांनी आज पत्रपरिषद घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक चिन्मन पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, परिवेक्ष अधिकारी पंकज कुमावत यांची उपस्थिती होती.

श्री.दिघावकर म्हणाले, या विभागाची सुत्रे सांभाळल्यानंतर आपण पाच विषयांवर विशेषतः लक्ष केंद्रीत केले. यात शेतकर्‍यांची फसवणूक, सुशिक्षीत बेरोजगारांची फसवणूक, गुटखा विरोधी कारवाया, जुगार्‍यांवर कारवाई आणि अवैध शस्त्र बाळगण्याबाबत मोहीम राबविण्यात येत आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात दाखल गुन्ह्यांपैकी अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात यंत्रणेला यश आले आहे. तर फसवणुकींच्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम वसुल करुन ती संबंधितांना परत मिळवून देण्यात आली आहे.

गुन्हे अन् कारवाई

गेल्या तीन महिन्यात शेतकरी फसवणुकीबाबत परिक्षेत्रात 1192 तक्रारी दाखल झाल्यात. यापैकी 191 प्रकरणात गुन्हे दाखल करुन 200 प्रकरणांमध्ये तडजोड घडवून आणण्यात आली आहे. फसवणुकीत झालेल्या शेतकर्‍यांना तब्बल 12 कोटी 60 लाख 33 हजार 708 रुपये परत मिळवून देण्यात आले आहेत.

सुशिक्षित बेरोजगारांच्या फसवणुकीच्या 39 तक्रारी प्राप्त झाल्यात. पैकी 30 गुन्हे दाखल करुन आतापर्यंत 52 लाख 95 हजार रुपये मिळवून देण्यात आले आहेत. अवैध धंद्यांबाबत परिक्षेत्रात 23 गुन्हे दाखल झाले.

यात 33 आरोपींना अटक करुन 68 लाख 37 हजार 754 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुटखा विरोधी 65 गुन्ह्यांमध्ये 86 आरोपी अटक करून चार कोटी 3 लाख 14 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

परिक्षेत्रात जुगारा संदर्भात 1265 गुन्हे दाखल करुन 2426 आरोपींना अटक करण्यात आली. यात रोख रक्कमेसह दोन कोटी 53 लाख 68 हजार 874 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दारुबंदीबाबत 2458 गुन्हे दाखल करुन 2436 जणांना अटक करण्यात आली. यात एक कोटी 99 लाख 83 हजार 859 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नाशिक ग्रामीणमध्ये सर्वाधिक शस्त्रे

परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांपैकी नाशिक ग्रामीण भागात शस्त्रांस्त्रांचे सर्वाधिक गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे. याठिकाणी 28 गुन्ह्यांमध्ये 29 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तर परिक्षेत्रात एकूण 88 गुन्हे दाखल होवून 135 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गावठी कट्टे, तलवार, सत्तुर, चॉपर, जीवंत काडतुसे, कोयते अशा हत्यांरांसह 25 लाख 19 हजार 355 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या