सचिन दसपुते | अहिल्यानगर
सोशल मीडियाने जग जवळ आणले, माहितीच्या महामार्गावर वेग वाढवला आणि तरूणाईला नवे आयाम दिले, हे सर्व सत्य आहे. परंतु याची दुसरी बाजू देखील तितकीच महत्वाची आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप ही आता फक्त ‘अॅप्स’ राहिली नाहीत, तर तरूणांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली आहेत. आणि नेमके येथूनच धोका, बदनामी, फसवणुक, मानसिक छळ आणि तरूणाईला गुन्हेगारीच्या विळख्यात ओढल्या जाण्याचा खेळ सुरू होतो. गेल्या 10 महिन्यांत एकट्या अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात 473 सोशल मीडिया संदर्भातील तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये 419 तक्रारी बदनामी, बनावट खाते व अश्लिल मजकुराच्या, तर 54 तक्रारी प्रत्यक्ष आर्थिक फसवणुकीच्या आहेत. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे बहुतांश प्रकरणांमध्ये हा प्रकार परिचित व्यक्तीकडूनच केला जात असल्याचे पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाले आहे.
शहराबरोबर ग्रामीण भागातही इंस्टाग्रामचे व्यसन वाढले आहे. तरूणांमधील भांडण, प्रेमभंग, खुन्नस, वैयक्तिक वैर या गोष्टी आता मैदानावर सुटत नाहीत, तर इंस्टाग्रामच्या बनावट आयडींमधून बदनामी मोहीम राबवून सुटतात, असे दिसून येत आहे. सोशल मीडियावर तरूणीने टाकलेले फोटो डाउनलोड करणे व त्यावर अश्लिल एडिटिंग करून व्हायरल करणे, बनावट अकाऊंटवरून बदनामीकारक मजकूर पोस्ट करणे, फेक प्रोफाइल तयार करणे असे प्रकार सर्रास घडत आहे.
त्या संदर्भातील तक्रारी सायबर पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. असे प्रकार वाढत असल्याने अनेक मुलींची मानसिक अवस्था ढासळते, कुटुंबावरही मोठा आघात होतो, त्यांची समाजात बदनामी होते. पोलीस तपासात तरूणीच्या परिचित व्यक्तीकडेच बनावट अकाऊंटचे धागेदोरे सापडतात आहे, हीच सर्वात चिंताजनक बाब आहे. आज बहुतेक घरांत स्मार्टफोन आहे. परंतु ‘स्मार्ट’ वापर मात्र फारच कमी आहे. कुठे क्लिक करायचे, कोणता मेसेज फॉरवर्ड करायचा, कोणते अॅप सुरक्षित आहे, याची माहिती नसल्याने तरूणाई स्वतःच स्वतःला जाळ्यात अडकवते आहे.
सोशल मीडियावरील फेक गुंतवणूक, बनावट लिंक, शेअर मार्केट संदर्भातील खोटी माहिती, फ्रॉडचे विविध अॅप्स यामध्ये तरूण मोठ्या प्रमाणात अडकत आहेत. याचा फायदा सायबर चोरटे घेत आहेत. 10 महिन्यांत 54 जण फसले गेल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत. हे आकडे प्रत्यक्षात यापेक्षा खूप मोठे आहेत; अनेकजण बदनामीमुळे तक्रार करतच नाहीत, असे सायबर पोलिसांनी सांगितले. पूर्वी शहरापुरता मर्यादित असलेला सोशल मीडिया वापर आता गावोगावी पोहचला आहे.
मात्र त्याचा वापर कसा करायचा, त्याचे फायदे-तोटे काय आहे याची जागरूकता नाही, गोपनीयता नाही, तपासणी न केल्याने सर्वसामान्य नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट सायबर भामट्यांच्या जाळ्यात सापडत असल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे येत आहेत. कोणत्याही व्यक्तीची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी, फसवणूक झाली तर 1930 या क्रमांकावर कॉल करून किंवा ऑनलाईन तक्रार नोंदवावी. तसेच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी.
सोशल मीडियातून समाजात तेढ
बनावट व्हिडिओ, समाजभावना भडकावणारे मेसेज, दोन गटांमध्ये कटुता निर्माण करणारी पोस्ट सध्या सर्रास व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरून भावना भडकविण्याचे प्रकार हे सर्व आता रोजचे झाले आहे. त्यात अल्पवयीन मुलांचाही सर्वाधिक सहभाग असल्याचे यापूर्वीच्या घटनांवरून पोलिसांच्या लक्ष्यात आले आहे. गुन्हेगारी टोळ्यांचेही सोशल मीडियावर गुप्त ग्रुप आहेत, ज्यात काटा कसा काढायचा याची आखणी केली जाते. एकमेकांना खुन्नस दिली जाते.
पालकांनी काय करावे ?
सोशल मीडिया हा धोकादायक ठरत आहे. तेथे मुलांना एकटे सोडणे म्हणजे संकट आमंत्रित करणे आहे. पालकांनी आपल्या मुलाच्या मोबाईलमध्ये किती इंस्टाग्राम खाते आहेत याची तपासणी केली पाहिजे, तो मोबाईलमध्ये काय करतो याची प्रत्येक आठवड्यातून एकदा तपासणी करावी, लोकेशन ‘मॅप’चा अॅक्सेस स्वतःकडे ठेवा जेणे करून तो कुठे आहे, खरे बोलतो का नाही हे समजेल. कोणत्या ग्रुपमध्ये तो/ती सदस्य आहे ते पहावे. तसेच फोटो, व्हिडिओ, फॉरवर्ड मेसेज कोणासोबत शेअर होतात यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
सायबर पोलिसांकडून जनजागृती
येथील सायबर पोलिसांकडून शाळा, कॉलेजमध्ये जनजागृती केली जात आहे. सायबर पोलीस आता शाळा-कॉलेजमध्ये शिबिरे घेऊ लागले आहेत. त्यात तरूणांना सोशल मीडियाचे फायदे-तोटे सांगितले जात आहे. एखाद्याची सोशल मीडियावर बदनामी केली तर त्याचे काय परिणाम होते, याचा कायदेशीर अर्थ पोलिसांकडून सांगितला जात आहे. फेक अकाऊंट वापरल्यास कोणता गुन्हा दाखल होतो, मुलींना लक्ष्य करणार्या गुन्हेगारीचे वास्तव काय आहे, सुरक्षित सोशल मीडिया वापराचे नियम, याबाबत जनजागृती केली जात आहे.




