नाशिक | प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी १० हजार डॉक्टरांची सेवा देण्याची तयारी असल्याचे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कुंभमेळ्यात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने आरोग्यसेवेचे मोठे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या माध्यमातून डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्याची ऑफर तोगडिया यांनी दिली. यापूर्वीही त्यांनी देशभरातील १० हजारांहून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांशी सेवा उपक्रमासाठी जोडणी असल्याचे सांगितले आहे.
शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर बोलताना, “शेतकरी आत्महत्या ही आमच्यासाठी शरमेची बाब आहे,” असे तोगडिया यांनी म्हटले. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कुंभमेळ्यासाठी आरोग्य, सेवा आणि भाविकांच्या सुविधांबाबत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.”



