Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपमध्ये अंतर्गत खदखद कायम

भाजपमध्ये अंतर्गत खदखद कायम

मुंबई । उद्धव ढगे पाटील Mumbai

राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा उबग आल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दोन महिने राजकारणातून सुट्टी घेत असल्याचे जाहीर केल्याने भाजप अंतर्गत खदखद कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशातच राज्य सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या रूपाने सत्तेचा तिसरा वाटेकरी आल्याने आतातरी राज्य मंत्रिमंडळात मूळ भाजपच्या आमदारांना स्थान मिळावे यासाठी भाजपमध्ये दबाव वाढला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे 10 मंत्री सहभागी आहेत. या 10 मंत्र्यांमध्ये फक्त सहा मंत्री मूळ भाजपचे आहेत. तर राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित, अतुल सावे आणि सुरेश खाडे हे चार जण उपरे आहेत. यापैकी विखे पाटील हे मूळ काँग्रेसचे आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मंत्रिपद मिळविले. गावित हे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले. भाजपने त्यांना मंत्री केले आहे. तर त्यांची मुलगी हीना गावित या नंदुरबारच्या खासदार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

भाजपचे विद्यमान मंत्री अतुल सावे हे शिवसेनेचे माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे चिरंजीव आहेत. अतुल सावे हे शिवसेनेतून भाजपमध्ये आले. याआधी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. आता शिंदे मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. सांगली जिल्ह्यातील मंत्री सुरेश खाडे हेही मूळ भाजपचे नाहीत. भाजपमध्ये येण्यापूर्वी खाडे हे रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षात कार्यरत होते. 2004 मध्ये ते प्रथम भाजपच्या चिन्हावर विधानसभेत निवडून आले. फडणवीस मंत्रिमंडळात शेवटच्या तीन-सहा महिन्यात त्यांना सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. आता शिंदे मंत्रिमंडळात खाडे हे कामगार मंत्री आहेत.

भाजपने सत्तेतील सहभागाप्रमाणे विधान परिषदेवर बाहेरून आलेल्या नेत्यांची वर्णी लावून स्वपक्षातील नेत्यांकडे दुर्लक्ष केले. राष्ट्रवादीतून आलेल्या छत्रपती उदयनराजे, धनंजय महाडिक यांना राज्यसभा दिली. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री केले. अनेकांना विधानसभेची उमेदवारी दिली. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर आदींचे विधान परिषदेवर पुनर्वसन केले. अन्य पक्षातील नेत्यांना पायघड्या घालण्याच्या पक्षातील प्रवृत्तीवर मूळ भाजपचे नेते, पदाधिकारी नाराज आहेत.

आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी नवे मित्र पक्ष जोडताना, त्यांना सत्तेत वाटा देत असताना भाजपसाठी दिवसरात्र मेहनत करणार्‍या नेत्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी प्रातिनिधिक भावना काल पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली. राजकीय विरोधकांना फोडता फोडता भविष्यात भाजप फुटू नये, अशी अपेक्षा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. ही भावना एकट्या मुंडे यांची नाही तर मूळ भाजपच्या असलेल्या सर्व नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची असल्याचे मुंडे यांनी अप्रत्यक्ष सूचित केले आहे.

भाजपचे मंत्री : देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा, चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, विजयकुमार गावित, अतुल सावे

- Advertisment -

ताज्या बातम्या