कोणाच्या हक्काचे, कष्टाचे, कर्तृत्वाचे यश आपल्या पदरात खेचणे, आपल्या पदाचा, सत्तेचा अधिकाराचा दुरूपयोग अर्थातच हा गंभीर गुन्हा आणि अशा गुन्ह्याचे परीणाम अनेकदा सामान्य जनतेला भोगावे लागतात. लाचलुचपत सारख्या गंभीर समस्येमुळे शासनाला दरवर्षी अब्ज डाॅलरचा तोटा होतो. भ्रष्टाचार समाजातील मुख्य समस्या आहे जी इतर समस्येची जन्मदाती आहे.
माणसातील स्वार्थीपणा इतका जास्त वाढला आहे की तो स्वतः व्यतिरिक्त कोणाचा विचार करीत नाही आणि हे सुद्धा समजत नाही की आपल्या छोट्याशा फायद्यासाठी समाजाला किती मोठा धोखा पत्करावा लागतो. भ्रष्टाचारामुळे समाजातील श्रीमंत-दारिद्र यांच्यातील अंतर हे वाढतच चालले आहे. गरीब आणखी गरीब व श्रीमंत आणखी श्रीमंत होत चालले आहेत. भ्रष्टाचार म्हणजे लाचलुचपतपणा अर्थात की जेव्हा कधी कोणी व्यक्ती कायद्याचा विरूद्ध जावून आपल्या स्वार्थापोटी वाईट मार्गाचे आचरण करतो तेव्हा त्याला भ्रष्टाचार म्हणतात.
भ्रष्टाचार समाजातील खुपच गंभीर समस्या आहे. ही समस्या पुर्ण समाजाला पोकळ करीत आहे. प्रत्येक क्षेत्र कमी-जास्त प्रमाणात भ्रष्टाचारामध्ये गुंतल्याचे आढळून येते आहे. आजकाल आपण वर्तमानपत्रे, सोशल मिडीया व इतर मार्गाने भ्रष्टाचारबद्दल नवनवीन घोटाळे ऐकतो, वाचतो. भ्रष्टाचार हे गुणवत्तापुर्ण शिक्षण, संस्कार, कायदा, प्रामाणिकपणा, नितीनियम, कर्तव्य, निस्वार्थ सेवाभाव, अशा गोष्टींना संपवित आहे.
देशात पुर्वीपासुनच बँक घोटाळे, सुशिक्षीत बेरोजगारी, गरीबी, अशिक्षा, जातीवाद, आतंकवाद, नक्षलवाद, शेतकरी आत्महत्या, प्रदूषण, भेसळखोरी, जमाखोरी, नोकरी व्यवसायाचा नावाखाली आर्थिक व्यवहार अशा सारख्या गंभीर समस्या आहेत. भ्रष्टाचार अशाच समस्यांना वाढविण्यास मदत करते. जेव्हापर्यंत अशा समस्यांना संपवणार नाही तो पर्यंत समाजातील सर्वांगीण विकास शक्य नाही. संपुर्ण जगात ही समस्या पसरली आहे. या भ्रष्टाचाराच्या समस्यात पुर्ण समाज भागीदार असतो. कारण लाच घेणे व लाच देणे यात दोघे ही बरोबरीचे आरोपी असतात.
सोबतच अन्यायाला शांतपणे सहन करणारा व्यक्तीही तेवढाच दोषी असतो. प्रत्येक कामात पारदर्शता आणणे खूप गरजेचे आहे. मागील काही वर्षात १५ पत्रकारांना मारण्यात आले जे भ्रष्ट्राचारा विरूद्ध काम करीत होते. इतर देशांपेक्षा भारतात पत्रकारांवर जास्त हल्ले करण्यात येतात असे निदर्शनास आले. महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्षात पुष्कळ आरटीआई कार्यकत्यांची हत्या करण्यात आली आहे. काही सामाजीक कार्यकत्यांना अन्याया विरूद्ध बंड पुकारल्यामुळे जीव सुद्धा गमवावा लागला. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात भ्रष्टाचारा विरूद्ध काम करणाऱ्या व्यक्तींसोबत घटना घडून आल्याचे दिसून येते.
एकीकडे शिक्षणाचे होत चालले बाजारीकरण होत चालले आहे. आजच्या वातावरणात व्यावसायीक व उच्च शिक्षण घेणे सामान्य माणसाला परवडण्यासारखे राहिले नाही. लहान मुलांचा नर्सरी ते उच्च शिक्षणा पर्यंत पालकांकडून मोठे शुल्क आकारण्यात येते. सोबतच महागड्या कोचिंग क्लासेसची संख्याही वाढत आहे. शाळा महाविद्यालयांमधे नोकरभर्तीचा नावाखाली लाखो रूपयांची देवाण-घेवाण होते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
भारतात भ्रष्टाचारा विरूद्ध कायदेः-
भारतीय दंड संहिता 1860
भ्रष्टाचार निवारण अधिनियम 1988
बेनामी देवघेव निषेध अधिनियम
अर्थशोधन निवारण अधिनियम 2002
आयकर अधिनियम 1961ची अभियोग धारा
भ्रष्टाचार निवारण संशोधक कायदा 2018
भ्रष्टाचाराच्या नियंत्रणाकरीता काही उपाय योजनाः-
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी घरापासून सुरवात करणे गरजेचे आहे. त्यानंतर समाजात याबाबत जनजागृती आवश्यक आहे. जेणेकरून समाजातून भ्रष्टाचाराला हद्दपार करता येईल.
आपल्या डोळ्या देखत अनेकदा भ्रष्टाचारासंबंधी कामे घडत असतात पण आपण त्या गोष्टीला गंभीरपणे घेत नाही जेव्हा की आपण सुद्धा त्याला बळी पडतो ह्या संबंधी सर्व नागरीकांमधे जागृकता येणे खूप गरजेचे आहे.
कायद्याच्या अवघड गोष्टींना सोप्याभाषेत दर्शवायला हवे, जेणेकरून सामान्य माणसाला स्वतःच्या कर्तव्य व अधिकारांची जाणीव हाईल.
शासकीय अधिकारीवर्ग ज्या पदावर कार्यरत असतो त्या पदाची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्याची असते तेव्हा कार्य करतांना कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता न्यायसंगत कार्य करायला हवे.
शासकीय कामात पारदर्शता आणायला हवी ज्यामुळे जनतेला शासनाचा कामाची पुर्ण माहिती मिळेल व यात प्रसार माध्यमांनी नेहमी निष्पक्ष, निर्भय व खंबीरपणे काम करायला हवे.
न्यायालयाचे निर्णय हे लवकरात लवकर लागायला हवे.
माणुसकी, प्रामाणीकपणा, समाजाचा प्रती आपले कर्तव्य व काही देणे लागते ही जाणीव प्रत्येकात असायला हवी.
– डाॅ. प्रितम भि. गेडाम