नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय आला आहे. जुलै महिन्यात जो हिंसाचार झाला, त्यासाठी न्यायालयाने हसीना यांना दोषी मानले आहे. त्यांना शिक्षा सुनावली आहे. हसीन यांच्यावर जुलै महिन्यात निशस्त्र नागरिकांवर गोळ्या चालवण्याचा आरोप आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर हसीना यांच्या अडचणी वाढल्या असून न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
शेख हसीना यांच्यावर एकूण ५ वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे आणि हत्या प्रकरणाचे आरोप आहेत. तीन सदस्यांच्या समितीनं एकमताने या निर्णयासाठी सहमती दर्शवली आणि न्यायालयाने अंतिम निकाल दिला.
बांगलादेशी माध्यम ‘प्रथम आलो’नुसार, न्यायालयाने हा निर्णय देताना हसीना यांची एक ऑडिओ क्लिप देखील जाहीर केली, जी बांग्लादेशात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. या ऑडिओमध्ये हसीना पोलीस प्रमुखांना लोकांवर गोळ्या चालवण्यास सांगत असल्याचे स्पष्ट होत आहे. न्यायालयाने आपला निर्णय देताना मानवाधिकार आयोगाच्या अहवालाचा देखील उल्लेख केला.
जुलै महिन्यात झालेल्या विद्रोहात ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यासाठी शेख हसीना दोषी आहे, हे न्यायालयाने मान्य केले. न्यायालयाने ते पुरावे सुद्धा समोर ठेवले, जे अभियोजक पक्षाने सादर केलेले. आयसीटीने शेख हसीना यांच्याविरोधात 458 पानांचा निकाल दिला आहे. निर्णयात म्हटलेय की, हसीना जानेवारी २०२४ पासून हुकूमशाह बनण्याच्या दिशेने अग्रेसर होत्या. जानेवारी २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षाला चिरडले. त्यानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले, तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडायला लावल्या.
दरम्यान, शेख हसीन सध्या भारतात राहत असून त्यांच्या अनुपस्थितीतच त्यांच्याविरुद्ध हा खटला चालवण्यात आला. 453 पानांच्या या निर्णयाचे वाचन करण्यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मुर्तजा मजूमदार यांनी हा निर्णय 6 भागांमध्ये सुनावणी केला जाईल असे सांगितले होते. बांगलादेशमधील टेलिव्हीजनवर या निकालाच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




