नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शेअर मार्केटमधून (Stock Market) चांगला परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने भामट्यांनी शहरातील चार गुंतवणूकदारांना (Investors) ५८ लाख ३४ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात (Cyber Police Station) भामट्यांविरोधात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सायबर पोलिसांकडे (Cyber Police) चौघांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भामट्यांनी १८ ऑक्टोबर २०२३ ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीत इंटरनेट व फोनवरून गंडा घातला. भामट्यांनी शहरातील गुंतवणूकदारांना फोन (Phone) करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमीष दाखवले. त्यानुसार गुंतवणूकदारांनी भामट्यांच्या आमिषांना बळी पडून सुमारे ५८ लाख रुपये भामट्यांना दिले. भामट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात हे पैसे गुंतवणूकदारांनी टाकले.
दरम्यान, गुंतवणूकदारांना पैसे गुंतवल्याचे भासवण्यासाठी भामट्यांनी बनावट ट्रेडींग अॅप तयार केले. या अॅपमध्ये पैसे गुंतवून शेअर खरेदी केल्याचे भासवून नफा होत असल्याचे भासवले. त्यामुळे इतर गुंतवणूकदारांनीही पैसे भरले. मात्र पैसे परत मागितल्यानंतर भामट्यांनी पैसे (Money) देण्यास नकार दिला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार गुंतवणूकदारांशी संपर्क साधणाऱ्यांसह ज्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले त्या बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.