मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (शनिवारी) चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Chennai Super Kings and Royal Challengers Bangalore) यांच्यात लढत होणार आहे. हा सामना बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविण्यात येणार असून, यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा चेन्नई सुपर किंग्ज आणि बंगळूरु आमनेसामने येणार आहेत.
चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियम वर झालेल्या पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यात बंगळूरु संघाने चेन्नई सुपरकिंग्ज विरूध्द ५० धावांनी दणदणीत विजय (Win) संपादन केला होता. या पराभवाची परतफेड करण्याची संधी चेन्नई सुपरकिंग्जकडे असणार आहे. उपांत्य फेरीतील आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी बंगळूरु (RCB) संघाला विजय अनिवार्य असणार आहे.
दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघांसाठी (CSK) पुढील ५ सामने नॉकआऊट असणार आहेत. आणखी एक पराभव झाल्यास स्पर्धेबाहेर पडावे लागणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि बंगळूरुमध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये ३५ सामने खेळविण्यात आले असून, चेन्नई सुपरकिंग्ज ने २२ तर बंगळूरुने १२ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर १ सामना रद्द करण्यात आला आहे. बंगळुरू येथे दोन्ही संघांमध्ये ११ सामने खेळविण्यात आले असून, दोन्ही संघांनी ५-५ विजय संपादन केले आहेत.