मुंबई | Mumbai
विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यानंतर आता विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपद देण्यात आले आहे. विवेक फळसाळकर हे आज ३० एप्रिल रोजी निवृत्त झाले. त्यांच्यानंतर आयुक्तपदासाठी सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावाची चर्चा होती. याशिवाय देवेन भारती यांच्याकडेही या पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
देवेन भारती हे १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांचे निरीक्षण करणारे महत्त्वाचे कार्यालय असलेल्या संयुक्त पोलीस आयुक्तांपैकी एक होते. याशिवाय त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा), महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख यांसारखी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासह शहरात नोंदवलेल्या अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या तपासात देवेन भारती सहभागी होते. २०१४ ते २०१९ दरम्यान देवेन भारती यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. परंतु ऑक्टोबर २०२० मध्ये महाविकास आघाडी सरकारने त्यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळमध्ये (MSSC) बदली केली.
विवेक फणसळकर यांनी ३० जून २०२२ रोजी आयुक्तपदाची धुरा स्वीकारली होती. पूर्वी मुंबई पोलिस आयुक्तपद अतिरिक्त महासंचालक दर्जाचे होते. २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रेणी वाढवून हे पद महासंचालक दर्जाचे केले. फणसळकर यांच्या निवृत्तीनंतर या निर्णयात बदल न झाल्यास आणि सेवाज्येष्ठतेचा निकष विचारात घेतला गेल्यास वर्मा आणि दाते या पदाचे प्रबळ दावेदार ठरतात.
आयपीएस अधिकारी असलेले भारती सुमारे ५४ वर्षांचे आहेत. भारती मूळचे बिहारमधील दरभंगा येथील आहेत. त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक केले आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. त्यांनी मुंबईत डीसीपी, झोन ९ आणि डीसीपी गुन्हे शाखा म्हणून काम केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा