नागपूर | Nagpur
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जेन झी पिढीची चर्चा सुरू आहे. मागील १२ वर्षात जे कुणालाच जमले नाही, ते जेन झीने करून दाखवले. त्यांनी मोदी सरकारमधील केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला भाग पाडले आहे. जेन झी वर कौतुकाचा वर्षाव ही होतोय. मात्र, हा सगळा कौतुक सोहळा सुरु असताना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी जेन झी पिढीबाबत काहीसे वेगळे मत व्यक्त केले आहे.
खरं तर, रविवारी कारगील विजयी दिनानिमित्त नागपूरमध्ये भोसला मिलिटरी स्कूलतर्फे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात हा कार्यक्रम पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील उपस्थित होते. दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं.
नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आजच्या ‘जेन-झी’ (Generation Z) पिढीबाबत बोलताना सोशल मीडियाचा अतिवापर आणि सततच्या स्क्रोलिंगमुळे तरुणांच्या मानसिकतेत मोठे बदल होत असल्याची चिंता व्यक्त केली. नांगरे पाटील म्हणाले की त्यांनी, “आज जेन-झीशी संवाद साधणं कठीण होत चाललं आहे. सततच्या स्क्रोलिंगमुळे मेंदूतील रासायनिक प्रक्रियांवर परिणाम होतो, म्हणजेच एक प्रकारचा ‘केमिकल लोचा’ निर्माण होतो,” असे सांगत डिजिटल व्यसनाबाबत इशारा दिला.
या कार्यक्रमात विश्वास नांगरे पाटील यांनी नव्या पिढीबाबत काही मतं मांडली. त्यांनी म्हटले की, आजच्या पिढीचा स्क्रीन टाइम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सतत मोबाईलवर स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे विचार करण्याची आणि भावनिकदृष्ट्या परिस्थिती हाताळण्याची क्षमता प्रभावित होत आहे. एकंदरित केमिकल लोचा झाला आहे. तसेच, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासाबरोबरच कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकदही प्रत्येकामध्ये विकसित होणे गरजेचे असायला हवी, असे विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटले.
‘जेन-झी’ ही देशाचे भविष्य आहे. मात्र, आजच्या काळात त्यांना काही सांगणंसुद्धा अवघड झालं आहे. पोलीस असोत किंवा सीमेवरील जवान, त्यांची सेवा ही कधीही न थांबणारी असते. कितीही काम केलं तरी टीका आणि शिव्या पोलिसांच्या वाट्याला येतात. गेल्या काही दिवसांपासून तर मीच अधिक शिव्या खातोय, अशी खंतही विश्वास नांगरे पाटील यांनी बोलून दाखवली.




