दिल्ली । Delhi
महाराष्ट्र राजकारणाच्या पटावर सध्या अत्यंत वेगवान आणि अनपेक्षित राजकीय घडामोडी घडत आहेत. मागील काही दिवसांपासून शांत वाटणाऱ्या राजकीय वर्तुळात आता अचानक मोठा भूकंप होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निमित्त ठरले आहे ते म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांमधील बड्या नेत्यांच्या गुप्त आणि अचानक झालेल्या गाठीभेटी! फुटीनंतर दुरावलेले दोन्ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्ष पुन्हा एकत्र येणार का, या प्रश्नाने सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा तीव्र चर्चांना उधाण आणले आहे.
या संपूर्ण राजकीय समीकरणांची सुरुवात झाली ती २२ जुलै रोजी. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अधिकृतरीत्या ही भेट राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, उस शेती आणि सहकार क्षेत्रातील अडचणींवर चर्चा करण्यासाठी होती, असे सांगण्यात आले. मात्र, दिल्लीतील या भेटीनंतर २४ तासांच्या आतच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला.
पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी थेट शरद पवार यांची भेट घेतली. या बड्या नेत्यांमध्ये जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही गटांतील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये झालेल्या या दीर्घ बैठकीमुळे राजकीय विश्लेषकही चक्रावून गेले आहेत. ‘ही केवळ कौटुंबिक किंवा सदिच्छा भेट होती की यामागे काही मोठे राजकीय गणित शिजतेय?’ असा प्रश्न आता विचारला जात आहे.
एकीकडे शरद पवार यांची भेट प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार घेत असतानाच, दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. महायुती आणि विरोधी आघाडीतील या बड्या नेत्यांच्या लागोपाठ होणाऱ्या भेटीगाठींमुळे राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, याचे अंदाज बांधणे कठीण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याच्या आणि काही गुप्त बैठका पार पडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, त्यानंतर या चर्चा काहीशा थंडावल्या होत्या. आता पुन्हा एकदा या महत्त्वाच्या भेटींमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या शक्यतांना नवे बळ मिळाले आहे. आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठे फेरबदल होतात की ही केवळ एक राजकीय रणनीती ठरते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



