नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या दीड महिन्यांपासून अमेरिकेला तोडीस तोड उत्तर देत असलेल्या इराणमध्ये मोठ्या घडामोडी सुरु आहेत. पडद्याआड सुरु असलेला संघर्ष आता उघडपणे समोर आला असून इराणमधील घडामोड जगाची चिंता वाढवणारी आहे. अमेरिका आणि इराण या दोघांमधील युद्ध संपण्याची काही चिन्हे दिसत नसून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत आक्रमक भूमिका घेतली असून इराणमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अहमद वाहिदी झाले इराणचे सर्वात शक्तिशाली नेते
अमेरिकेने केलेली युद्धबंदी बुधवारी संपत असताना आणि पाकिस्तानात चर्चेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत असताना न्यूयॉर्क पोस्ट आणि अमेरिकन थिंक टँक इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉरच्या अहवालानुसार इराणमध्ये ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) राजसत्तेवर पूर्णपणे कब्जा मिळविला आहे. आयआरजीसीचे मेजर जनरल अहमद वाहिदी हे इराणचे सर्वात शक्तिशाली नेते बनले आहेत. यामुळे जगावर महायुद्धाचे संकट घोंघावू लागले आहे.
अमेरिकेसोबतच्या शांतता चर्चेबद्दल निर्णय घेण्याचे अधिकारही वाहिदी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या हातात गेले आहेत. या सगळ्याला इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांची मूकसंमती असल्याचे समजते. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे हॉर्मुझचा समुद्री मार्ग उघडण्यास अनुकूल होते. मात्र, IRGC ने हा निर्णय धुडकावून लावत उलट आपल्या ‘फास्ट अटॅक शिप्स’च्या माध्यमातून हा मार्ग पूर्णपणे ब्लॉक केला आहे. गेल्या ४८ तासांत तीन जहाजांना लक्ष्य करण्यात आलं आहे. यातील दोन जहाजं भारतीय आहेत.
Rajasthan Refinery Fire: राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, PM मोदी उद्या करणार होते उद्धाटन
आत्ताच्या घडीला शेकडो जहाजे पर्शियन आखातात अडकून पडली आहे. विशेष म्हणजे इराणच्या शिष्टमंडळाचा भाग असलेले कट्टरतावादी नेते मोहम्मद बागेर जोलगाद्र यांनी परराष्ट्र मंत्री अरागची यांची तक्रार केली. अमेरिकेसोबत चर्चा करतेवेळी अरागची यांनी मवाळ पवित्रा घेतल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले. त्याचाच परिणाम म्हणून संपूर्ण शिष्टमंडळाला तेहरानला परत बोलावण्यात आले. आता इराणमध्ये मवाळ पवित्रा घेणाऱ्यांचा आवाज दाबण्यात आला आहे.
पुन्हा युद्धाचा धोका
शस्त्रसंधी संपण्याची वेळ जवळ येत आहे आणि इराणने चर्चेची पुढची फेरी फेटाळून लावली आहे. अमेरिकेच्या मागण्या अवास्तव असल्याचा ठपका IRGC ने ठेवला आहे. वॉशिंग्टनच्या तज्ज्ञांनुसार, इराणमधील या अंतर्गत सत्तापालटानंतर आता अर्थपूर्ण चर्चेची शक्यता संपली असून, अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा मोठा संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत.





