Sunday, June 23, 2024
Homeनगरसिंचनासाठी तातडीने आवर्तन द्या; मतदारसंघात दुष्काळ जाहीर करा

सिंचनासाठी तातडीने आवर्तन द्या; मतदारसंघात दुष्काळ जाहीर करा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

कोपरगाव मतदार संघातील गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना तातडीने सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनातून सिंचनासाठी आवर्तन द्या व कोपरगाव मतदार संघात दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे टंचाई आढावा बैठकीत केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या टंचाई आढावा बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील दुष्काळजन्य परिस्थिती मांडून विविध मागण्या केल्या आहेत. आ. काळे यांनी पालक मंत्र्यांना मतदार संघाच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या समस्या मांडताना दारणा समुहातून गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याच्या लाभधारक शेतकर्‍यांनी 7 नंबर फॉर्म भरलेले आहेत. अशा सर्व शेतकर्‍यांना तातडीने सिंचनासाठी आवर्तन द्यावे. कोपरगाव तालुक्यातील 63 गावे रब्बी व 16 गावे ही खरीप हंगामात धरली जातात.

परंतु तालुक्यातील सर्व 79 गावांमध्ये खरिपाचे पीक वर्षानुवर्षे घेतले जात असून सर्वच 79 गावांचा खरिपामध्ये समावेश करावा. तालुक्यातील सर्वच खरीप पिकांचे 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असून मतदार संघात 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड सर्वच महसूल मंडलात पडला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या निकषानुसार मतदार संघात दुष्काळाच्या उपाययोजना सुरू कराव्या. तालुका पर्जन्यछायेखाली येत असून तालुक्यातील पर्जन्यमान नेहमीच कमी असते. त्यामुळे कमी पर्जन्यमान होऊनही शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळत नाही व शासनाच्या विविध योजना व अनुदानाचा फायदा मिळत नाही त्यासाठी मतदार संघात स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी.

मतदार संघात ज्या ठिकाणी नागरिकांची पाण्याच्या टँकरची मागणी आहे त्यांना पाण्याचे टँकर तातडीने उपलब्ध करुन द्या, अशा मागण्या आ. आशुतोष काळे यांनी टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केल्या आहेत. बैठकीसाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, आ. बबनराव पाचपुते, आ. राम शिंदे, आ. किरण लहामटे, आ. लहू कानडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आदींसह शासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

गोदावरी उजव्या-कालव्याच्या आवर्तनाचे नियोजन अतिशय ढिसाळ आहे. उजव्या कालव्यावर अजूनही पिण्याच्या पाण्याचेच आवर्तन सुरू आहे. आजपर्यंत पिण्याच्या पाण्याचे आवर्तन आटोपून सिंचनासाठी आवर्तन देणे गरजेचे होते. परंतु पाटबंधारे विभागाला हे नियोजन करता आले नाही. पालकमंत्र्यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या