चीनने आपले कोअर इंटरेस्ट किंवा गाभ्याचे हितसंबंध अधोरेखित करून ठेवले आहेत. यामध्ये दक्षिण चीन समुद्र, तिबेट आणि दलाई लामांचा उत्तराधिकारी निवडीचा प्रश्नही समाविष्ट आहे. सध्याच्या दलाई लामांचे मंगोलियातील एका लहान मुलासोबतचे व्हिडिओ व्हायरल होत असून हा मुलगा दलाई लामांचा उत्तराधिकारी असू शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. चीनसाठी अर्थातच हा एक मोठा धक्का मानला जात आहे. नेमके काय आहे हे प्रकरण?
चीन आणि तिबेट यांच्यातील संबंध तणावपूर्ण स्वरुपाचेच आहेत. चीन तिबेटवर आपला दावा सांगत असला तरी मूळ तिबेटीयन लोकांमध्ये चीनविरोधी कमालीचा असंतोष आहे. तिबेटमधील सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न चीनकडून नियोजनबद्धपणाने सुरू आहे. कोअर इंटरेस्टमध्ये चीनने दलाई लामांचा उत्तराधिकारी निवडीचा प्रश्नही समाविष्ट केला आहे. याबाबत एक अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणजे सहा मार्च रोजी मंगोलियामधील बौद्ध धर्माचे 600 अनुयायी धरमशालामध्ये आले होते. त्यांच्या उपस्थितीत मोठा धार्मिक सोहळा तेथे पार पडला. या सोहळ्याकडे चीनचे आणि संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले होते. या सोहळ्यामध्ये साधारणतः दहा वर्षांच्या मुलाला आशीर्वाद देतानाची काही दृश्ये आणि छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. यामध्ये दलाई लामाही दिसले असून ते एकप्रकारे त्या छोट्या मुलाला दीक्षा देताहेत, असे दर्शवणारी ही दृश्ये होती. साहजिकच यामुळे हे दलाई लामांचे वारस आहेत का, अशी चर्चा सुरू झाली. अर्थात, याबाबत दलाई लामांकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
तिबेट पुरस्कृत बौद्ध धर्माला वज्रयान किंवा महायान असे म्हटले जाते. यामध्ये सर्वोच्च धर्मगुरू हे दलाई लामा म्हणून ओळखले जातात. त्यांच्यानंतर दुसरे सर्वात प्रभावशाली बौद्ध धर्मगुरू असणार्या व्यक्तीला पंचेन लामा म्हटले जाते. त्यानंतरचे तिसरे स्थान या लहान मुलाला दिले गेले आहे. परंतु हाच लहान मुलगा दलाई लामांचा उत्तराधिकारी किंवा वारस असणार आहे का, याबाबत स्पष्टता झालेली नाही. किंबहुना ती जाणीवपूर्वक देण्यात आलेली नाहीये. ही स्पष्टता न आणण्यामागे त्यांना चीनकडून असणारी असुरक्षितता हे प्रमुख कारण आहे. कारण चीनचा इतिहासच तसा राहिला आहे. 14 मे 1995 मध्ये तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी गेधुन चोएक्यी नीमा यांना 11 वे धर्मगुरू म्हणून घोषित केले होते. परंतु 17 मे 1995 मध्ये सहा वर्षीय गेधुन चोएक्यी नीमा कुटुंबियांसह रहस्यमयरीत्या गायब झाले. 28 मे 1996 पर्यंत या अपहरणामागे नेमका कुणाचा हात आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. संयुक्त राष्ट्राच्या बालहक्क कायद्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने हा मुद्दा उचलल्यानंतर चीनने पंचम लामा यांना कैद केल्याचे समोर आले होते. दरम्यान, 29 नोव्हेंबर 1995 मध्ये चीनने ग्लालसन नोरबू यांना पंचेन लामा घोषित केले होते. तसाच प्रकार घडू नये या भीतीमुळेच कदाचित सदर मुलाबाबतचा कसलाही तपशील किंवा त्याच्या निवडीबाबतची स्पष्टता जाहीर करण्यात आलेली नाही.
असे असले तरी दलाई लामांकडून अलीकडील काळात काही महत्त्वाची वक्तव्ये करण्यात आली होती. त्यामधील एक वक्तव्य असे होते की, पुढचे दलाई लामा किंवा 14 वे दलाई लामा हे कदाचित एका स्वतंत्र, लोकशाही असणार्या देशामधून येतील. कदाचित ती महिलाही असू शकते. यातील पहिल्या विधानाचा अर्थ लावून पुढील दलाई लामा हे भारतातील असतील का? अशीही चर्चा आहे. तथापि, सध्या ज्या मुलाची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत त्यातील मुलाकडे अमेरिका आणि मंगोलिया या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. सदर मुलगा एका गणिताच्या प्राध्यापकांच्या जुळ्या मुलांपैकी एक आहे. या मुलांची नावे अगुदाई आणि अल्चिताई असल्याचे सांगितले जाते. तो खलखा जेटसन धम्पा रिनपोछे या मंगोलियातील सर्वश्रेष्ठ धर्मगुरूंचा पुनर्जन्म असल्याचे मानले जाते आणि त्यामुळे त्याची निवड करण्यात आली आहे.
या सर्व घडामोडींचा चीनला मोठा धक्का बसला आहे. कारण चीनला कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या मर्जीतले दलाई लामा तिबेटमधील बुद्धधर्मियांवर लादायचे होते. परंतु तिबेटीयन लोकांचा याला प्रचंड विरोध आहे. दलाई लामांचा उत्तराधिकारी निवडण्याचा वाद हा चीन आणि तिबेट यांच्यातील तसा जुना वाद आहे. मात्र यामध्ये आता अमेरिकेसारखी काही मोठी राष्ट्रे स्वारस्य घेऊ लागली आहेत. अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये मध्यंतरी एक विधेयक सादर करण्यात आले आणि ते बहुमताने संमतही करण्यात आले असून त्याला कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या विधेयकानुसार, तिबेटमधील दलाई लामांचे उत्तराधिकारी निवडण्याचा संपूर्ण अधिकार तिबेटी जनतेचा आहे. यामध्ये कोणत्याही बाह्य राष्ट्राची भूमिका किंवा हस्तक्षेप असता कामा नये. चीनने हस्तक्षेप केला तर चीनवर आर्थिक निर्बंध लादले जावेत, अशी तरतूद या कायद्यात आहे. अमेरिकेसारख्या राष्ट्राने अशा स्वरुपाचा कायदा केल्यामुळे आंतरराष्ट्रीय जनमत या प्रश्नाविषयी संवेदनशील बनू लागले आहे.
तिबेटमधील 60 लाख जनता 14 व्या दलाई लामांची अनुयायी आहे. त्यांच्या धार्मिक भावना दलाई लामांमध्ये गुंतलेल्या आहेत. त्यामुळे चीनकडून निवडल्या जाणार्या दलाई लामांना तिबेटीयन समुदायाकडून अजिबात महत्त्व दिले जाणार नाही. असे असूनही जर चीनने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर तिबेटीयन जनतेच्या धार्मिक भावना मोठ्या प्रमाणावर दुखावल्या जातील. त्यातून तिबेटमध्येही चळवळ सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही
चीनच्या आक्रमणानंतर 14 वे दलाई लामा भारताच्या आश्रयाला आले आणि 1959 मध्ये भारताने त्यांना राजाश्रय दिला. हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथून तिबेटचे स्वतंत्र सरकार चालवण्याची परवानगी त्यांना देण्यात आली. याला गव्हर्नमेंट इन एक्झाईल असे म्हणतात. त्यानुसार पंतप्रधान, अर्थमंत्री अशा सर्वांमार्फत धरमशालामधून तिबेटचे सरकार चालवले जात आहे. त्यामुळे या मुद्याबाबत भारतात चर्चा होणे स्वाभाविक आहे. मागील काळातही या मुद्यावरून चीन आणि भारत यांच्यात तणाव निर्माण झालेला पाहायला मिळाला. तिबेटपासून 25 किलोमीटर अंतरावर असणार्या तवांगमधून सहाव्या दलाई लामांची निवड करण्यात आली होती. या तवांगला ज्या-ज्यावेळी दलाई लामांची भेट होते त्या-त्यावेळी भारत-चीन यांच्यात तणाव निर्माण होतो. येणार्या काळात तिबेटीयन जनतेच्या धार्मिक भावनांचा आदर चीनकडून ठेवला गेला पाहिजे ही बाब भारताने निक्षून चीनला सांगणे गरजेचे आहे.