Friday, February 6, 2026
Homeदेश विदेशMosque Explosion : मशिदीत नमाज अदा करताना शक्तिशाली बॉम्बस्फोट; ३१ जणांचा मृत्यू,...

Mosque Explosion : मशिदीत नमाज अदा करताना शक्तिशाली बॉम्बस्फोट; ३१ जणांचा मृत्यू, १६९ हून अधिक जखमी

इस्लामाबाद । Islamabad

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पुन्हा एकदा भीषण दहशतवादी हल्ल्याने हादरली आहे. शहरातील तरलाई परिसरातील एका मशिदीत शुक्रवारी जुम्म्याच्या नमाजानंतर भीषण आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेत आतापर्यंत ३१ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, १६९ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

नमाजानंतर मशिदीत उसळला रक्ताचा सडा मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी मशिदीमध्ये जुम्म्याची नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. नमाज संपल्यानंतर भाविक बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच आत्मघाती हल्लेखोराने स्वतःला स्फोटकांनी उडवून दिले. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, मशिदीच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आजूबाजूचा परिसर मोठ्या आवाजाने हादरून गेला. स्फोटानंतर मशिदीत सर्वत्र रक्ताचा सडा आणि मृतदेहांचा खच पडल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळाले. परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

YouTube video player

सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट जारी या भीषण घटनेची माहिती मिळताच इस्लामाबाद पोलीस, बचाव पथके आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांसह पाकिस्तानच्या सैन्याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षा दलांनी संपूर्ण तरलाई परिसराला वेढा घातला असून तपास मोहिमेसाठी हा भाग सील करण्यात आला आहे. जखमींना तात्काळ मदत पुरवण्यासाठी रुग्णवाहिकांचा ताफा तैनात करण्यात आला असून, शहरातील सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये ‘इमर्जन्सी अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने आरोग्य विभागाने रक्तदानाचे आवाहन केले आहे.

राष्ट्राध्यक्षांकडून हल्ल्याचा निषेध पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी या अमानवीय कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी या हल्ल्याला ‘मानवतेविरोधातील सर्वात मोठा गुन्हा’ असे संबोधले आहे. “दहशतवाद्यांचा कोणताही धर्म नसतो, त्यांनी केवळ निष्पाप जीवांचा बळी घेतला आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. झरदारी यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले असून जखमींना तातडीने सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह राजधानीच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरात एवढा मोठा आत्मघाती हल्ला झाल्याने पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली असून, भविष्यात असे हल्ले रोखण्याचे मोठे आव्हान आता शहबाज शरीफ सरकारसमोर उभे राहिले आहे.

ताज्या बातम्या