Monday, April 6, 2026
HomeनगरAhilyanagar Mayor : अहिल्यानगर महानगरपालिकेत महापौर ज्योती गाडे आणि उपमहापौर धनंजय जाधव...

Ahilyanagar Mayor : अहिल्यानगर महानगरपालिकेत महापौर ज्योती गाडे आणि उपमहापौर धनंजय जाधव यांनी पदाचा पदभार स्वीकारला

अहिल्यानगर । Ahilyanagar

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नव्याने निवडून आलेल्या महापौर ज्योतीताई अमोल गाडे आणि उपमहापौर धनंजय जाधव यांनी आज आपल्या पदाचा औपचारिक पदभार स्वीकारला. या प्रसंगी आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

- Advertisement -

या वेळी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, मनोज कोतकर, निखिल वारे, सुरेश बनसोडे, महेश लोंढे, सतीश शिंदे, बाळासाहेब पवार, पुष्पा बोरुडे, अजय ढोणे आदींसह नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “अहिल्यानगर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या युतीची सत्ता आली आहे. राज्यात आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव महापौर निवडला गेला आहे, हे स्वर्गीय अजितदादा पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “आम्ही सर्वजण अजितदादांकडे जाऊन नगर विकासासाठी मोठा निधी आणण्याचा विचार करत होतो, पण त्यांच्या निधनाने ही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तरीसुद्धा नागरिकांनी पक्षांवर टाकलेला विश्वास कायम ठेवून शहराच्या विकासासाठी एकहाती सत्ता दिली आहे. आता प्रश्न अनेक आहेत, अडचणीही आहेत, पण आम्ही एकत्रितपणे त्या अडचणींवर मात करू.”

डॉ. विखे पाटील म्हणाले की, “महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांवर जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाणार आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आधीच मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरू आहेत. उपनगरांच्या विकासासाठीही प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम विकास आराखडा तयार करून प्रत्येक प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावला जाईल,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “पूर्वी महापौर व उपमहापौर पदासाठी राजकीय घोडेबाजार होत असे, पण आता तो काळ संपला आहे. आम्ही ठरावासाठी पैसे द्यावे लागतात असे ऐकले होते, मात्र आता असा प्रकार होणार नाही. पारदर्शक आणि स्वच्छ कारभार करून नगरकरांचा विश्वास संपादन करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.

नूतन महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या, “आजपासूनच मी कामाला सुरुवात करत आहे. शहराची पाहणी करून प्राधान्यक्रमाने प्रश्न सोडवले जातील. नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे विशेष लक्ष देत सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन अहिल्यानगरचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहीन. अहिल्यादेवी होळकरांच्या प्रेरणेने कार्य करत नागरिकांचा विश्वास जपेन,” असे त्या म्हणाल्या.

नूतन उपमहापौर धनंजय जाधव यांनी सांगितले की, “आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि नगरसेवकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास कायम ठेवणार आहे. शहरातील पाणीप्रश्न, वाहतूक समस्या आणि प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. दर्जेदार विकास आणि स्वच्छ प्रशासन हेच माझे ध्येय असेल,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी सभागृहाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीही वाहिली.

ताज्या बातम्या

Rahuri By Election 2026 : राहुरी पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट; प्राजक्त तनपुरेंची...

0
अहिल्यानगर | Ahilyanagar जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी (Baramati and Rahuri Assembly Constituencies) आज (सोमवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता....