Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखमानसिकता कधी बदलणार?

मानसिकता कधी बदलणार?

घरातील पाणी भरणे हे महिलांचे काम आहे हे समाजमान्य आहे. त्यावर आता जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालातदेखील शिक्कामोर्तब केलेले दिसते. जगातील तब्बल सव्वाशे कोटींपेक्षा जास्त लोक पाण्यासाठी महिलांवर अवलंबून आहेत. १८० कोटींपेक्षा जास्त लोक पाण्याची सोय नसलेल्या घरात राहतात. जिथे पाणी भरण्याची मुख्य जबाबदारी महिलांवर आहे, ज्यांच्या घरी थेट पाणीपुरवठा होत नाही, अशा बहुसंख्य घरांत पाणी भरण्याचे काम महिलांकडेच सोपवले जाते.

जागतिक आरोग्य संघटना आणि यूनिसेफ यांच्या संयुक्त अहवालात हा निष्कर्ष नमूद आहे. जलसंकट जसजसे वाढत जाईल तसतसा त्याचा विपरीत परिणाम महिलांवर होत जाईल, असा इशाराही त्यात देण्यात आला आहे. पाण्यासाठी महिलांची परवड मराठी मुलखाला तरी नवीन नाही. शहरी भागात घरात नळाचे पाणी आले असले तरी पाणी महिलाच भरतात. डोक्यावर हंडे-भांडे घेऊन पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिला हे ग्रामीण, दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील सामान्य चित्र आहे. उन्हाळा जवळ आला की, वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाई भेडसावू लागते. त्याच काळात शाळेतील मुलींची उपस्थिती रोडावल्याचे आढळते. चौकशी केली तर मुली पाणी भरायला जातात, असे पालकांचे ठराविक उत्तर मिळते, असा शिक्षकांचा अनुभव आहे. काही गावांमधील वास्तव अंगावर काटा आणणारे आहे. डोंगराळ भागातील काही गावात केवळ पाणी भरण्याची सोय व्हावी म्हणून पुरुष दुसरे लग्न करतात. दुसऱ्या पत्नीला ‘पाणी पत्नी’ संबोधले जाते. पाणीपत्नी आयुष्यभर पाणी भरते. तिला कोणतेही हक्क आणि अधिकार दिले जात नाहीत. अशा गावांच्या कहाण्या माध्यमात वेळोवेळी प्रसिद्ध होतात. ठाणे जिल्ह्यातील डेंगनमळ गावातील अशा महिलांच्या स्थितीवरची कहाणी प्रसार माध्यमांत नुकतीच प्रसिद्ध झाली होती. समाजाच्या पठडीबद्ध मानसिकतेचे भयंकर परिणाम महिला आयुष्यभर भोगतात. पाणी भरून-भरून अनेक महिलांना शारीरिक व्याधी जडतात तर लहान वयाच्या मुलींच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होतो. अनेकींचे शिक्षण थांबते. मुलगी शिकली आणि घराची प्रगती झाली’ असे म्हंटले जाते. मग ज्या मुली पाणी भरण्याच्या ओझ्यामुळे शाळेत जाऊन शिकू शकत नाहीत त्यांच्या प्रगतीचे काय? निरक्षरतेचे परिणाम त्यांनी त्यांचे आयुष्यभर भोगावेत, अशी समाजाची अपेक्षा असावी का? परंपरेने महिलांना दिले जाणारे दुय्यमत्वदेखील याचे एक सबळ कारण आहे. त्यामुळेच घरातील सगळी कामे महिलांनीच करायची असतात हे समाजाने, विशेषतः पुरुषांनी गृहीत धरले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे जगाचे छोट्या खेड्यात रूपांतर झाले आहे. संवाद माध्यमांनी क्रांती केली आहे. त्यातील शोध रोज नवनवीन क्षीतिजे गाठत आहे. तथापि महिलांविषयीच्या मानसिकतेत मात्र जराही बदल झाल्याचे आढळत नाही. महिला कमावत्या झाल्या तरी घरातील कामे त्यांनीच करावीत, मासिक पाळीशी संबंधित प्रथा पाळाव्यात, सतत दुय्य्मत्व विनातक्रार स्वीकारावे, त्यांचे डोके स्वयंपाकघरापुरतेच आहे, निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग नाकारणे हे बिनबोभाट मान्य करावे, अशीच समाजाची अपेक्षा नसते का? त्यात बदल होत नाही तोपर्यंत असे कितीही अहवाल आले आणि गेले तरी महिलांची अवस्था ‘जैसे थे’च राहील.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या