Monday, November 25, 2024
Homeअग्रलेखसमाजाची मानसिकता बदलणे गरजेचे

समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे

सध्याच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही अंधश्रद्धांचा विळखा अधिकाधिक घट्ट होत आहे. तो कसा, हे दाखवणार्‍या घटनाही अधूनमधून घडतात. पुण्यातील धायरी भागात नुकतीच अशी घटना उघडकीस आली. मुल होत नाही या कारणामुळे एका विवाहितेला तिच्या घरच्यांनी स्मशानभुमीतील राख खाऊ घातली आणि अघोरी पूजा करण्यास भाग पाडले अशी तक्रार त्या महिलेने पोलीसात दाखल केली आहे. समाजाने अंधश्रद्धांचा त्याग करावा यासाठी संतांनी, समाजसुधारकांनी आणि शिक्षण प्रसारकांनी आयुष्यभर कष्ट उपसले. त्यांच्या साहित्यातून अंधश्रद्धांवर कठोर प्रहार केले. पण माणसे मात्र अंधश्रद्धांच्या अधिकाधिक आहारी जातात. ‘नवसे कन्या पुत्र होती, तर का करणे लागे पती’ असा प्रश्न संत तुकाराम महाराजांनी विचारला आहे. तरीही मुल होण्यासाठी महिलेला तिच्या घरच्यांनी स्मशानातील राख खाऊ घालावी आणि तिनेही ती खावी? या घटनेकडे फक्त अंधश्रद्धेच्याच दृष्टीकोनातून पाहून चालणार नाही. या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित होतात. धायरी घटनेतील पीडित महिला उच्चशिक्षित आहे. शिक्षणाने माणसाचे ज्ञान वाढते. बुद्धीचा-आकलनशक्तीचा विकास होतो. माणसे तर्कसंगत विचार करु लागतात. त्याची जगण्याबद्दलची समज वाढते असे मानले जाते. तथापि लोकसंख्येचा अर्धा हिस्सा व्यापणार्‍या महिलांच्या बाबतीत तसे का घडत नसावे? अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचे धाडस शिक्षित महिलाही का दाखवू शकत नाहीत? टोकाचा अन्याय देखील त्या का सहन करत असाव्यात? अर्थात दोष फक्त शिक्षणपद्धतीलाच देऊन भागेल का? संबंधित महिला पेशाने संगणक अभियंता आहे. विवाह झाल्यापासूनन तिला सासरी त्रास होता असे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. केवळ स्मशानभुमीतलाच प्रसंग नव्हे तर तिला होणार्‍या त्रासाविषयी त्याविषयी निदान माहेरच्यांना सांगावे असेही तिला वाटले नसेल का? या सगळ्या प्रश्नांचे मुळ मुलींच्या संगोपनात दडले आहे. कोणत्याही परिस्थितीशी जमवून घ्यावे, सहन करावे असेच त्यांच्या मनावर नकळत्या वयापासून बिंबवले जाते. मुलींनी स्वत:ची मते ठामपणे मांडू नयेत, प्रतिक्रिया देऊ नये, उंच आवाजात बोलू नये अशीच समाजाची अपेक्षा असते. मुलीने सासरी नीट संसार करावा, कारण तिच्यावर सासर आणि माहेर अशा दोन कुटुंबांची प्रतिष्ठा अवलंबून आहे याची जाणीव विवाहित मुलींना पदोपदी करुन दिली जाते. धायरीत घडलेल्या घटनेतील विवाहिता या सामाजिक दबावाला बळी पडली असेल? म्हणून अन्यायाविरोधात वेळीच दाद मागण्याचे धाडस ती दाखवू शकली नसेल का? समाजाच्या पारंपरिक अपेक्षांना काही मुली नाकारतात. पण त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी सुद्धा नसते. तेव्हा, अंधश्रद्धांचा नायनाट करण्यासाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी समाजातील सर्वच घटकांची मानसिकता बदलायला हवी. महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन आमुलाग्र बदलायला हवा. तसा बदल घडेल का? 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या