
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तीन दिवसांचा चीन दौरा संपला असून या दौऱ्यात अनेक महत्वाचे करार, इराण-अमेरिका युद्धासंबंधी चर्चा करण्यात आल्या. मात्र या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात त्यांच्या परतीच्या प्रवासादरम्यान घडलेल्या एका प्रसंगाची सध्या आंतरराष्ट्रीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर एका धक्कादायक दाव्याने खळबळ उडवून दिली आहे. सायबर हेरगिरी आणि इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवण्याच्या भीतीपोटी, अमेरिकी शिष्टमंडळाने चीनकडून मिळालेल्या सर्व भेटवस्तू, फोन आणि बॅजेस ‘एअर फोर्स वन’ विमानात चढण्यापूर्वीच कचरापेटीत फेकून दिल्याचे समोर आले आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मायदेशी परतण्याची तयारी करत असताना अमेरिकेच्या सुरक्षा पथकाने चीनकडून मिळालेल्या सर्व वस्तू एका ठिकाणी जमा केल्या. यामध्ये व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्यांना वापरासाठी दिलेले खास ‘बर्नर फोन्स’, शिष्टमंडळाचे पिन आणि ओळखपत्रांसारख्या अनेक वस्तूंचा समावेश होता. सुरक्षेचा उपाय म्हणून या वस्तू अमेरिकेला सोबत नेण्याऐवजी, विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच त्या कचऱ्याच्या पेटीत फेकून देण्यात आल्या.
अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी “चीनकडून मिळालेली कोणतीही इलेक्ट्रॉनिक किंवा इतर वस्तू विमानात न्यायची नाही,” अशा स्पष्ट आणि कडक सूचना शिष्टमंडळाला दिल्या होत्या. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
दरम्यान, या संपूर्ण घडामोडीवर आणि वस्तू फेकल्याच्या वृत्तावर व्हाईट हाऊस किंवा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
एअर फोर्स वनमधील प्रतिनिधींचे वैयक्तिक फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे विशेष ‘फॅराडे बॅग’मध्ये ठेवण्यात आली होती. या बॅग विद्युतचुंबकीय संकेत रोखतात आणि कोणत्याही प्रकारचा मागोवा घेणे किंवा डेटा अडवणे टाळण्यासाठी वापरल्या जातात. अमेरिकन प्रशासनाने या प्रकरणी अधिकृत निवेदन जारी केले नाही.
या घटनेमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढता अविश्वास आणि तंत्रज्ञान युद्ध पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या काही वर्षांपासून सायबर सुरक्षा, हेरगिरी, चिप तंत्रज्ञान आणि डेटा सुरक्षेच्या बाबतीत वॉशिंग्टन आणि बीजिंगमधील तणाव सातत्याने वाढत आहे. अमेरिकेने चीनवर वारंवार सायबर हेरगिरीचा आरोप केला आहे, तर चीनने हे आरोप नाकारले आहेत.




