मुंबई । Mumbai
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या (Jain Boarding Hostel) जागेच्या कथित बेकायदेशीर विक्रीप्रकरणाने शहरातील राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. या व्यवहारात केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे नाव पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे.
या प्रकरणी जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त करत मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समाजाचा आरोप आहे की, ज्या जमिनीची विक्री गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला करण्यात आली, त्या कंपनीत मोहोळ यांची भागीदारी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही मोहोळ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जमिनीबाबत माझ्यावर जे आरोप होत आहेत, त्यांचा मला काहीही संबंध नाही. मी गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीतून २५ नोव्हेंबर २०२४ रोजीच बाहेर पडलो होतो, आणि हा व्यवहार त्यानंतर झालेला आहे. माझ्या कंपनीतील काळात या जमिनीचा कोणताही व्यवहार झाला नव्हता.” मोहोळ पुढे म्हणाले, “राजू शेट्टी यांनी माझ्याशी चर्चा केली असती तर त्यांना सर्व सत्य समजले असते. मात्र, कोणतीही चर्चा न करता आरोप केले गेले, जे पूर्णपणे तथ्यहीन आहेत. मी सर्व अधिकृत कागदपत्रं सार्वजनिक केल्याने सत्य स्पष्ट होईल. जर मी चुकीचा असेन, तर मला देखील शिक्षा व्हावी.”
शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर आरोप करताच, मोहोळांनीही पलटवार केला. ते म्हणाले, “पुण्यातील जैन समाजाने माझ्यावर आरोप केले नाहीत. पण राजू शेट्टी यांनी बोलताच ‘बिळात बसलेला उंदीर बाहेर आला’, असा टोला त्यांनी धंगेकरांना लगावला. राजकारणात आरोप करण्यापूर्वी सत्य तपासले पाहिजे, कारण खोट्या आरोपांमुळे एखाद्याचं करियर उद्ध्वस्त होऊ शकतं.” मोहोळांनी धंगेकरांविषयी अधिक बोलणे टाळत म्हटलं, “ते वैफल्यग्रस्त आहेत आणि सर्वांकडून नाकारले गेले आहेत. त्यांच्या आरोपांना मी महत्त्व देत नाही.”
दरम्यान, राजू शेट्टी यांनीही मोहोळ यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. “मोहोळ यांनी बिल्डरांना हाताशी धरून जैन बोर्डिंगची जमीन हडपली,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे प्रकरण अधिकच तीव्र झालं आहे.
या वादात आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सुद्धा उतरले आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटलं, “पुण्यातील जैन धर्मियांची तब्बल साडेतीन एकर मोक्याची जागा कटकारस्थान रचून हडपण्यात आली आहे. यात सरकारमधील काही नेते आणि त्यांच्या नातलगांचा सहभाग आहे. सत्तेचा वरदहस्त असलेल्या लोकांनी जैन मंदिरही गिळंकृत केलं.” पवार पुढे म्हणाले, “या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जैन बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. जर सरकारने दुर्लक्ष केलं, तर आमच्याकडे असलेले पुरावे घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू.”
जैन बोर्डिंग हाऊसची जमीन विक्री प्रकरण सध्या पुण्यातील चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहे. सामाजिक आणि राजकीय पातळीवर दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे. जैन समाजाने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली असून, आगामी काळात या वादाचा निकाल राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतो.
या प्रकरणातील सर्व पक्षांनी आपापली भूमिका मांडल्यानंतर आता नागरिकांचे लक्ष सरकार आणि न्यायव्यवस्थेच्या पुढील पावलांकडे लागले आहे. पुण्यातील या जमीन व्यवहाराने केवळ जैन समाजात नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ उठवले आहे.




