तरुण मुलाच्या अकाली निधनाने त्याचे आईवडील कोलमडून पडणे, दुःखाचा पूर येणे स्वाभाविक आहे. तथापि स्वतःच्या डोळ्यातील पाणी आटले नाही तरी त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ गरजूंसाठी पाण्याची सोय करण्याची घटना पेठ मधील सातपुडे पाडा येथे घडली. मिस्त्री कुटुंबाने त्यांचा कर्ता मुलगा गमावला. तथापि पालकांनी त्याच्या स्मृती चिरंतन जपण्याचे ठरवले. सातपुडे पाड्यातील लोकांपर्यंत पाणी पोहोचावे यासाठी त्यांनी मोठे आर्थिक योगदान दिले. अनेक परिवहन अधिकारी आणि जूनोठी ग्रामपंचायतीनेही मदत केली. सोशल नेटवर्किंग फोरम या सामाजिक संस्थेच्या जल अभियानांतर्गत हे काम झाले. अनेकांच्या आयुष्यात अनेक दुर्दैवी प्रसंग ओढवतात. अनेक जण त्यांचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक त्यात गमावतात. माणसे जाण्याचे दुःख मोठेच. उर्वरितांचे आयुष्यभर न संपणारे देखील. त्यांची आठवण व्यापक पद्धतीने कशी जपायची याचे उदाहरण मिस्त्री कुटुंबीयांनी घालून दिले आहे. समाजातील ‘नाही रे’ वर्गाला समाजाच्या मदतीची आवश्यकता असते. त्यांचे दैनंदिन जगणेही कठीण असते. वाढत्या महागाईच्या काळात हातातोंडाची गाठ पडणेही त्यांच्यासाठी अनेकदा जिकिरीचे असते. अनेक सामाजिक संस्था स्वयंस्फूर्तीने काम करतात. त्यांनाही सर्व प्रकारचे पाठबळ गरजेचे असते. अनेक चांगल्या कामांना मनुष्यबळाची देखील उणीव जाणवते. आर्थिक पाठबळाअभावी कामे थांबतात. ग्रामीण आणि आदिवासी भागात गरजांचा पट अजून विस्तारतो. या परिसराचे शिक्षण, आरोग्य आणि पाणीटंचाईची समस्या नेहमीच भेडसावते. त्याची पूर्तता करण्याचे अनेक मार्ग सामाजिक कार्यकर्ते सांगतात. वाचन माणसाचे जगणे समृद्ध करते असे म्हंटले जाते. व्यक्तिमत्वाची जडणघडण होते. वैचारिक दृष्टिकोन व्यापक होण्यास वाचन मदत करते. त्यामुळे शहरी भागाइतकीच ग्रामीण तरुणाईलाही वाचनालयाची सुविधा असावी असे निरीक्षण या क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते नोंदवतात. अशी वाचनालये उभारली जाऊ शकतात. अनुकूल परिस्थितीअभावी इच्छा असूनही या परिसरातील मुलांना पुस्तके उपलब्ध होतीलच असे नाही. पुस्तके त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाऊ शकतात. ग्रामीण भागातील शाळा घरापासून लांब असतात. विद्यार्थी पायीच जाताना आढळतात. याचा विपरीत परिणाम मुलींच्या शाळेवर होण्याची भीती तद्न्य व्यक्त करतात. या मुलींचे शाळेत जाणे सहज होईल अशी सुविधा लोक त्यांना देऊ शकतात. या व अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना मदतीचा हात हवा असतो. आपापल्या कुवतीप्रमाणे लोक ती उणीव नक्कीच भरून काढू शकतात. संतांनीही सामाजिक मदतीचे महत्व अभंगांमधून व्यक्त केले आहे. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा.. असा उपदेश संत तुकाराम महाराजांनी केला आहे. संत गाडगेबाबांनी समाजासाठी त्यांचे आयुष्य वेचले. हाती खराटा घेऊनच वावरले. समाजातील नाही रे वर्गाची कणव आल्यामुळेच सुधारकांनी समाजसुधारणांचा पाया रचला. त्याला अनेक पद्धतींनी मदतीचे धुमारे फुटू शकतात. गरज आहे जाणीव रुजण्याची. सहवेदना जाणवण्याची. धुमारे फुटत आहेत आणि सर्वांचेच जगणे सुकर व्हावे यासाठी लोक दुःखाचे कढ बाजूला सारून पुढे येत आहेत ही बाब प्रेरणादायी आहे.