जळगाव –
राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव रिक्षाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोन मित्र जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास खोटेनगर ते बांभोरी दरम्यानच्या पोद्दार शाळेजवळील हॉटेल गिरणाईजवळ घडली.
बांभोरीकडून जळगावकडे मोटारसायकलने निघालेल्या विवेक उर्फ विक्कीबाबा पंढरीनाथ नन्नवरे (वय 31) व हेमंत चंद्रहास ललवाणी (वय 34, आहुजानगर) या दोघं तरुण मित्रांना समोरुन येणार्या भरधाव रिक्षाने जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळाजवळ रिक्षा कलंडली असून रिक्षाचालक पसार झाल्याचे काही जणांनी सांगितले. तर याच वेळी मोटारसायकलला धडक मारुन ट्रक पसार झाल्याचेही काही जणांचे म्हणणे आहे.
मृत विवेक हा अगोदर जळगावातील एका खासगी कंपनीत होता. तर सध्या वाळूचे ट्रॅक्टरवर अथवा मिळेल ते काम तो करीत होता. विवेकच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. तो एस.टी.तील चेकर पंढरीनाथ नामदेव नन्नवरे यांचा मुलगा होत.
या घटनेतील दुसरा मृत हेमंत चंद्रहास ललवाणी हा अविवाहित तरुण होता. तो जैन पाइप कंपनीत ठेकेदारामार्फत कामाला होता. त्याच्या वडिलांचे एक वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आई, लहान भाऊ असा परिवार आहे.
नातेवाईकांचा आक्रोश
याबाबत कळताच मृत तरुणांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाजवळ पोहचताच तरुणांचे मृतदेह बघून त्यांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. तर या घटनेमुळे काही जणांना ग्लानी आली. घटनास्थळी नागरिक आणि मृतांच्या नातलगांची गर्दी झाली.या अपघाताप्रसंगी महामार्गावर बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. शहर वाहतूक नियंत्रण शाखा व पाळधी दूरक्षेत्राच्या पोलिसांनी काही वेळाने वाहतूक सुरळीत केली. यासंदर्भात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल पाटील यांनी खबर दिली.
खड्ड्यांमुळे वाढताय अपघात
घटना स्थळावरील राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. या महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाढत्या अपघातांमुळे त्या मार्गाने ये-जा करणार्या वाहनचालक, प्रवाशांनी संताप व्यक्त केला. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात होणाऱे अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही त्या भागातील नागरिक, वाहनचालकांमधून जोर धरत आहे. तर याप्रकरणी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.