अन्याय होत राहिल्यास वेगळा विचार : खडसे
जळगाव । प्रतिनिधी
पक्षात निर्णय प्रक्रियेत आता मला ठेवले नाही. उत्तर महाराष्ट्राची बैठक असताना केवळ जळगाव जिल्ह्यातील बैठकीसाठी मला बोलवले. जाणीवपूर्वक काही व्यक्तींकडून अपमान केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रमातही मला बोलवले जात नाही.
असेच सुरु राहिले तर मला वेगळा विचार करावा लागले, असा ईशारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षालाच दिला. भाजपची उत्तर महाराष्ट्राची बैठक आज जळगावात झाली. या बैठकीत रोहिणी खडसे व पंकजा मुंडे यांना पाडणार्यांची नावे व पुरावे जाहीर करण्याची परवानगी एकनाथ खडसे यांनी पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागितली. परंतु त्यांनी नकार देत हा विषय राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत नेऊ, असे आश्वासन दिल्याचे खडसे यांनी सांगितले.
सर्व पुरावे नावानिशी पत्रकारांसमोर मांडेल
विधानसभा निवडणुकीत माझ्या मुलीविरुद्ध करण्यात आलेल्या कारवायांचे पुरावे या पूर्वीच पक्ष श्रेष्टीकडे दिले आहेत. जर पक्षाने परवानगी दिली तर आता सर्व पुरावे नावानिशी पत्रकारांसमोर मांडेल. असा थेट पावित्रा खडसे यांनी घेतला. भाजपची विभागीय बैठक बालानी लॉन येथे सुरू आहे.
या बैठकीला खडसे दुपारी साडेतीन वाजता हजर झाले. त्यांना याबाबत छेडले असता त्यांनी सांगितले की मला साडेतीन वाजता बोलावले होते म्हणून मी वेळेवर हजर झालो.
गिरिषभाऊ म्हणतात तसे मी सर्व पुरावे आधीच दिले आहेत. मला आता प्रदेशाध्यशानी परवानगी द्यावी मी आता सर्व पुरावे द्यायला तयार आहे असेही खडसे यांनी सांगितले. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक उपस्थित आहेत.