पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे भेटी प्रसंगी कौतुकोदगार !
रोटरी व जळगाव रनर्स ग्रुपतर्फे नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात आयोजित सुरक्षित बाजार हा सोशल डिस्टन्सींगसह सर्व उपाययोजनांना लक्षात घेऊन भरविण्यात येत असून याचा राज्यभरात आदर्श घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते या बाजाराला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
रोटरी व जळगाव रनर्स ग्रुपतर्फे नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात आयोजित सुरक्षित बाजार भरविण्यात येत असून याला अतिशय चांगला प्रतिसाद लाभला आहे. या बाजाराला आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट दिली. रनर्स ग्रुपचे किरण बच्छाव व ज्ञानेश्वर बढे यांनी ना. पाटील यांना या बाजाराबाबत माहिती दिली.
पालकमंत्र्यांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. या बाजारात येणार्या प्रत्येक ग्राहकाला आधी पाण्याने हात धुण्याचे निर्देश दिले जात असून नंतर सॅनिटायझरने पुन्हा एकदा हात स्वच्छ केले जातात. यानंतर इन्फ्रारेड थर्मामीटरच्या मदतीने येणार्या व्यक्तीच्या शरिराचे तापमानाचे मापन केले जाते.
नंतर ग्राहकाला टोकन देऊन त्यांना खुर्च्यांवर एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर बसण्याची सुरक्षा करण्यात आली आहे. टोकनच्या क्रमांकानुसार संबंधीत ग्राहकाचे नाव पुकारण्यात आल्यानंतर त्याला फळे आणि पालेभाज्या खरेदी करता येतात. या विक्रेत्यांनी स्वच्छतेचे पालन केले असून येथे सेंद्रीय पध्दतीत उत्पादीत करण्यात आलेली कृषी उत्पादने उपलब्ध करण्यात आलेली आहेत.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या प्रणालीचे बारकाईने निरिक्षण केले. यासोबत त्यांनी स्वत: या बाजारातून खरेदी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलतांना या उपक्रमाचे कौतुक केले. ना. पाटील म्हणाले की, सध्या लॉकडाऊन सुरू असून सर्वांनी सोशल डिस्टन्सींगसह स्वच्छतेच्या नियमांचे पालन करायचे असून या बाजारात हे सर्व नियम अगदी तंतोतंत पाळले जात आहेत.
यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी फळे व पालेभाज्या खरेदी करता येणार असून या माध्यमातून शेतकर्यांच्या मालास बाजारपेठ मिळाली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केली. राज्यात अनेक ठिकाणी या प्रकारातील बाजार असले तरी येथे नियमांचे अतिशय उत्तम प्रकारे पालन करण्यात येत असून इतरांनी याचा आदर्श घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी रोटरी क्लब व रनर्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.