जळगाव । प्रतिनिधी jalgaon
जळगाव विमानतळाचा (Jalgaon Airport) समावेश उडाण 5.0 अंतर्गत रीजनल कनेक्टीव्हिटी स्कीम मध्ये करण्यात आाल्यानंतर आता जळगावसह सिंधुदुर्ग, नांदेड आणि अगत्ती या विमानतळांवरून नियमीतपणे विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी उडो एव्हीएशन प्रायव्हेटे लिमिटेड कंपनीच्या फ्लाय-91 या विमानसेवेला परवानगी प्रदान करण्यात आली आहे. दरम्यान खासदार उन्मेष पाटील यांनी सातत्याने केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया (Minister Jyotiraditya Scindia) यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे जळगावातून पुन्हा एकदा हवाई सेवा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.
गेल्या दीड वर्षापासून जळगाव विमानतळावरून हवाई सेवा बंद आहे. केवळ व्हीआयपी लोकप्रतिनीधींसाठीच या विमानतळाचा वापर केला जात असून जळगावातून सुरू झालेली मुंबई आणि अहमदाबाद सेवा ही बंद पडली आहे. दरम्यान यासंदर्भात भाजपाचे खासदार उन्मेश पाटील यांनी केंद्रीय पाठपुरावा केल्याने उडाण 5.0 यामध्ये जळगाव विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. उडाण 5.0 योजनेच्या आरएसी उपक्रमाच्या अंतर्गत जळगाव येथून नियमीतपणे पुणे, हैदराबाद आणि गोवा येथे विमानसेवा सुरू होणार आहे. वर नमूद केल्यानुसार फ्लाय-91 कंपनीची विमाने ही सेवा प्रदान करणार आहेत. या विमानसेवांमध्ये नियमीत तसेच बिझनेस या दोन्ही क्लासची सुविधा असणारी विमाने उपलब्ध करण्यात आली आहेत. अर्थात, यामुळे सर्वसामान्यांसह व्यावसायीक व उद्योजकांना मोठी सुविधा मिळणार आहे. सर्व प्रकारच्या चाचण्यांची पूर्तता करून येत्या काही महिन्यांमध्ये या तिन्ही मार्गावरील विमानसेवा सुरू होईल.
पुणे, गोवा, हैदराबाद सेवा
भाजपाचे खासदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे जळगाव-पुणे विमानसेवा लवकरच सुरू केली जाणार आहे. जळगाव विमानतळावरील नियमीत प्रवासी वाहतूक सेवा ही बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. जळगाव ते पुणे आणि पुणे ते जळगाव अशी विमानसेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता जळगाव-पुणे आणि जळगाव-गोवा-हैदराबाद अशा हवाई सेवेला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
डिसेंबरपर्यंत सेवा सुरू होणार
जळगाव जिल्ह्यातून पुणे येथे दररोज हजारो प्रवासी ये-जा करत असतात. यातच भुसावळ व जळगावहून पुणे येथे जाण्यासाठी मोजक्या रेल्वे असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. एसटी अथवा खासगी लक्झरी बसेसवर पूर्णपणे अवलंबून रहावे लागत होते मात्र साधारणत: डिसेंबरपर्यंत ही सेवा सुरू होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.