Thursday, November 21, 2024
Homeशब्दगंधकंजर समाजात परिवर्तनाची गरज

कंजर समाजात परिवर्तनाची गरज

  • ब्रिटिशांनी 1871 मध्ये क्रिमिनल ट्राइब्ज अ‍ॅक्ट आणि इतर कायदे करून भटक्या विमुक्तांना जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का उमटविला. सेटलमेंट नावाच्या बंदी खात्यात डांबलेल्या माणसांना-जमातींना तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गुन्हेगार जमाती कायदा व जनजाती यांचे नागरिकांना तारेच्या कुंपणातून 31 ऑगस्ट 1952 रोजी मुक्त केले. कंजरभाट समाजामध्ये गटा-तटाचे राजकारण, जातपंचायतीत भरकटलेले तरूण, कुरघोडी, मी पणा, वर्चस्वाची लढाई अशी समाजाची वाटचाल सुरू असून जग 21व्या शतकाकडे जात आहे. मात्र, समाज आजही अठराव्या शतकातच जगत असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. या समाजाचे प्रश्न अनेक व अथांग आहेत. मात्र शासनाकडे समाजाच्या समस्या कोण मांडणार? इतर समाज एकत्र येवून सरकारच्या विरोधात आपल्या हक्कासाठी लढा देत आहे.मात्र कंजरभाट समाजात ना चळवळ, ना संघटना, ना महिला व युवकांची वैचारीक फळी उभी राहते.त्यामुळे शासन याची दखल घेत नाही. या मागचे मुख्य कारण म्हणजे समाज एकजुट नसल्यामुळे संघटन व कुशल नेतृत्वामुळे समाज वंचित आहे. जो पर्यंत समाजाचे संघटन, कुशल नेतृत्व होत नाही तो पर्यंत आपण तारेच्या कुंपणातच आहे. समाजाने गट-तट बाजूला ठेवून एकत्र यावे. आज समाजात सकारात्मक परिवर्तनाची गरज आहे. अंनिस व समविचारी संघटनेतर्फे जळगाव येथे 1 मार्च रोजी जातपंचायत मुठमाती संकल्प परिषद आयोजित करण्यात आली त्या निमित्त हा लेख….

चिंतन : नरेश बागडे

समाजातील प्रत्येक क्षेत्रात वाटचाल करतांना आव्हानांची मालिका समोर असतेच मात्र, त्यावर परिस्थितीनुरूप संयंम ठेवत, प्रसंगी सक्षम होत मात केली. तरच आपण यशस्वी होऊ शकतो. अन्यायाबद्दल त्यांच्यात प्रतिकार शक्ती निर्माण करणे, जातपंचायतीचा छळ थांबविण्यासाठी, पिडीतांना मानसिक पाठबळ देण्यासाठी तसेच सामाजिक बहिष्कार विरोध कायदा प्रभावीपणे अंमल होण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि जळगाव जिल्हा महिला असोसिएशन यांच्या सयुंक्त पुढाकाराने तसेच इतर समविचारी संस्था व संघटना यांच्या सहकार्याने जात पंचायतीच्या मनमानीला मूठमाती संकल्प परिषद दि.1 मार्च 2020 रोजी जळगाव येथे होत असून अनिंसविरूध्द गैरसमज आहेत. समाजातील अनेक अंधश्रध्दा आणि गैरसमज आहेत. या अंधश्रध्दा संपुष्टात याव्यात व समाजातील चुकीच्या प्रथांविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने हि परिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेत समाजाच्या नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते, युवा व महिलांनी येवून आपली बाजू मांडण्याची चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. जो पर्यंत आपण एकत्र येवून सकारात्मक चर्चा करणार नाही तो पर्यंत समाजात सकारात्मक परिवर्तन घडणार नाही.

- Advertisement -

पुरोगामी निर्णयांचा पुनरूच्चार करण्याची गरज
पुरोगामी निर्णयांचा सातत्याने पुनरूच्चार करणे ही काळाची गरज आहे.जातपंचायतीसारखी समांतर न्यायव्यवस्था वर्षानुवर्ष सामाजिक, सांस्कृतीक व वैयक्तीक जीवन कायदेविरोधी भूमिका घेवून नियंत्रीत करू पाहते. आंतरजातीय विवाहसंदर्भात दिलेले निवाडे कित्येक कुंटूबाचे जीवन उद्ध्वस्त करणारे ठरले आहेत. यावर उपाय म्हणून राज्यसरकारने जातपंचायत विरोधी कायदा केला.त्याबाबत जात व खाप पंचायत किंवा समाजाकडून कोणतेही निर्बंध नसावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे. तरीही अनेक जातपंचायती तिकडे डोळेझाक करतात. आता तर या पंच महाशयांची अवस्था बिकट झाली आहे. याला कारणीभूत पण स्वत: पंचमहाशयच ठरले आहे. पंचकमिटी फक्त नावालाच उरले आहे. ठिकठिकाणी पंचावर गुन्हे दाखल होत असल्याने काही ठिकाणी लपून छपून पंचायत बसत असल्याचे चित्र दिसत आहे. पण हे कुठपर्यंत सुरू राहणार याबाबत पंचमहाशयानी चुकीच्या प्रथांना फाटा देत परिवर्तनाची कास धरावी. शासनाच्या हजारोंच्या घरात योजना त्याबाबत कधी पंचानी समाज प्रबोधन किंवा सामाजिक चर्चा, समाज विचार मंथन बैठका घेतल्या आहेत का? तोंड बघून न्यायनिवाडा करणे हे कितपत योग्य आहे. बदलत्या काळाबरोबर पंचांनी स्वत:ला बदलून घेतले पाहिजे.

मानसिकता कधी बदलणार?
महाराष्ट्र शासनाने जातपंचायतीबाबत कायदा अंमलात आणला आहे. जातपंचायतविरोध कायद्यान्वये गुन्हेही दाखल होत आहेत. पण जातपंचायतीचे समूळ उच्चाटन अद्याप झाले नाही. या कायद्याबाबत कधी छुपा, कधी उघड, कधी न्यायालयात, कधी राजकीय पुढार्‍यांना निवेदन तर कधी रस्त्यावर संघर्ष सुरू आहे. आपण भारतात राहतो, त्यामुळे भारताचे संविधान मानले पाहिजे. पण समाज या कायद्याकडे कानाडोळा करत असून समाजाचा कायदा सर्वश्रेष्ठ मानत असतात. जातपंचायती आपली ‘हम करेसो’ प्रवृत्ती दाखविण्याची संधी घेतात. पूर्वीचा काळ-वेळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. त्यामुळे समाजाच्या पंचांनी कायद्याच्या चौकटीत राहून जातपंचायती केल्या पाहिजे. जातपंचायतीत आम्ही कोणताही बदल करणार नाही, भारताच्या राज्य घटनेला मानत नाही, कायद्याला घाबरत नाही, ते सहसा संघर्ष करत नाहीत, ते कधीही परिवर्तनाच्या बाजूने नसतात. प्रयत्नवादाला त्यांचा विरोध असतो. कितीही कायदे आले, कितीही पोलीस प्रशासनाचा धाक दाखविले तरी कोणीही आपले काहीच बिघडवू शकत नाही. अशी मिरासदारी मानसिकता का निर्माण होते? याची कारणे अनेक असतील. तथापि परिणाम मात्र समाजाच्या सर्वसामान्य जनतेलाच सहन करावे लागतात. जातपंचायतीच्या कायद्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतला आहे. काही पंचमंडळी कायद्याला नजरअंदाज करत आहे. मात्र, हे लक्षात घेतले पाहिजे की, कायद्यापासून कोणीही वाचवू शकत नाही,त्याचा ज्वलंत उदाहरण जळगावचा आहे. असे नाही की हर एक जण कायदा जाणतो. परंतु ते माहीत नाही, अशी थाप पंचमंडळी नेहमी मारत असतात. सरकारी पातळीवर सुध्दा जातपंचायतीच्या मनमानी कारभाराकडे दुर्लक्ष केले जाते. शासन इतके प्रगल्भ कधी होणार? या पंचाना कायद्याचा वचक बसला पाहिजे कारण पंचाची कातडी जाड आहे. त्यांना काहीही फरक पडत नाही. असेही बोलले जावू लागले आहे.

कायद्याला विरोध करणारा वर्ग
महाराष्ट्रात अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे विधेयक बहुमताने मंजूर झाले असते तरी ते होण्यासाठी बराच कालावधी लागला. या विधेयकाचा विरोध करणारा वर्ग अजूनही मधून-मधून विरोध वेगळ्या रूपात प्रकट करतो. अनेक प्रकाराचे कायदे अस्तित्वात असतांना विविध प्रकार रोखण्यासाठी न्यायसंस्थेलाच पुढाकार घ्यावा लागावा हे समाजाच्या मागासलेपणावर शिक्कामोर्तब करणारेच ठरते.

समाजनेते खरच झोपले आहेत का?
समाजातील काळोखाविरूध्द बोलण्याची जोखीम उचलायला कोणीच का तयार नसावे? नाही म्हणायला हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या दोन- चार व्यक्तींनी अशी जोखीम पत्करली. समाजात चुकीचे घडणार्‍या बाबींना ते विरोध करत आहे. समाजातील अनिष्ठाविरूध्द लढत आहे. त्यांच्या विचारांचा संघर्ष सुरू आहे. कुण्या व्यक्तीविरूध्द नव्हे तर प्रकृतीविरूध्द संघर्ष सुरू आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपीविरूध्द आवाज उठवला जात आहेत. तथापि अशा मोजक्या व्यक्तींना शिव्याची लाखोळी वाहिली जाते. आवाज उठविण्यार्‍यांविरूध्द समाजाच्या काही नेत्यांनी विविध जिल्ह्यात, तालुक्यात बैठका घेऊन न्यायालयात याचिका दाखल करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून जेलमध्ये पाठविण्यापर्यंतची मजल गेली. पण आवाज उठविणार्‍या व जोखीम घेतलेल्या व्यक्तीच्या मागेही अनेक व्यक्ती उभे राहिले, असे समाजाला का दिसले नाही. गाढ झोपलेल्या व्यक्तीला उठवणे शक्य असते, पण झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करणे शक्य नसते असे म्हटले जाते. समाजनेते आणि पंच हे समाजाचे जबाबदार घटक मानले जातात, असे अनेक जबाबदार घटक खरेच सध्या झोपले आहेत की, कायद्याच्या धाकामुळे त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे? समाजातील अशा जबाबदार घटकांना आलेली उदासीनता कोण आणि कशी घालवणार. पंचांसह समाजनेत्यांनी समाजाच्या बाजूने उभे राहुन अन्यायाविरूध्द लढले पाहिजे, अन्यथा समाजनेत्यांची अवस्था ‘मुक्या’ प्राण्याप्रमाणे होईल. आम्ही अमूक करू, आम्ही टमूक करू, मात्र प्रत्यक्षात कृती शून्य. अशी सडेतोड भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

पुरोगामी आणि प्रतिगामी
समाजसुधारक दोन प्रकारचे असतात बोलके समाजसुधारक व कृतीशील समाजसुधारक, गाडगेबाबा हे कृतीशील समाजसुधारक होते स्वत: निरक्षर असून समाजाला त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले.गाडगेबाबांनी लोकांची मानसिक स्वच्छता केली. अंधश्रध्दा कर्मकांडावर प्रहार केले. मायबापहो, हातावर भाकरी घेऊन खा, घरात वाटी अन् पेला नसला तर चालेल पण मुलांना शाळा शिकवा म्हणणारे संत गाडगेबाबा एकमेव होते.कधीच शाळेत न जाणार्‍या गाडगेबाबा यांच्या नावाने विद्यापीठ आहे. पुस्तकाचा जास्त संबंध न आलेले गाडगेबाबा पुस्तकात आहेत.जे लोक गाडगेबाबा यांना अडाणी म्हणतात ते लोक गाडगेबाबा यांच्यावर पीएच.डी. करून स्वत:चे शिक्षण सिध्द करत आहेत.केवढा मोठा हा विरोधाभास आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी समाजात जेव्हा नवीन विचार मांडला तेव्हापासून त्यांचे समर्थन करणारा एक वर्ग होता. आणि त्यांच्या परिवर्तनाच्या विचाराला विरोध करणारा दुसरा वर्ग होता.समाजातल्या या दोन विचारधारांना तेव्हा ढोबळमनाने पुरोगामी आणि प्रतिगामी असे म्हटले जात होते. सुधारणवादी विचारांच्या बरोबर राहणारे पुरोगामी आणि त्यांचे पाय ओढणारे प्रतिगामी म्हणून ओळखले जाऊ लागले.महाराष्ट्राच्या इतिहासात हे दोन विचार सातत्याने वाहतांना दिसतात.काळ बदलला, समाज साक्षर झाला. शिक्षणाचे प्रमाण वाढले जीवनमानावर तंत्रज्ञान अधिराज्य गाजवू लागले तरीही कंजरभाट समाजात परिवर्तनास नकार देणारा विचार अजूनही सर्वत्र वेगळ्या रूपात का होईना वाहतांना दिसत आहे.

कायद्याच्या चौकटीत काम केले पाहिजे
कंजरभाटसह इतर समाजासाठी अंनिसतर्फे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन 1 मार्चला करण्यात आले आहे. याचे मुख्यउद्देश म्हणजे समाजात सुरू असलेल्या चुकीच्या प्रथेसह मनमानी कारोभाराला आळा घालणे आहे. मात्र याबाबत काहि समाजनेत्यांकडून अनिंसच्या विरोधात रान पेटवले जात आहे. कायद्याच्या चौकटीत राहून समाजाने काम केले पाहिजे असे वारंवार सांगूनही कुणी ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत. वास्तव कुणाला मान्य करायचेच नाही. उलट त्याला अधिक फाटे कसे सुटतील आणि प्रकरण चिघळेल कसे? हे पाहण्याचा प्रयत्न अनेकजण करीत असल्याचे घडणार्‍या प्रकरणावरून लक्षात येते. समाजामध्ये तेढ निर्माण झाल्याशिवाय आपल्याकडे राजकारणही होत नाही. हेही तितकेच सत्य आहे. जो कायद्यात तो फायद्यात अशी चर्चा सुरू आहे.

भेदाभेदाच्या मुद्यावरून चिखलफेक
समाजामध्ये भेदाभेदाच्या मुद्यावरून सर्वत्र चिखलफेक सुरू आहे. हा खेळ कुंपणावर बसून खेळता येत नाही. त्यामुळे चिखलफेकीच्या या खेळात सर्वच समाजनेते बरबटले आहेत.काहिंनी स्वार्थी राजकारणासाठी समाजाला वेठीला धरले आहे.ज्या समाजसुधारकांनी आणि राष्ट्र पुरूषांनी समाजसुधारणेसाठी आजन्म प्रयत्न केले.त्यांनाही जाती धर्माचे बिल्ले चिकटवलेले जातात.असे करण्यामुळे समाजनेत्यांचे राजकारण होत असले तरी, समाज मात्र विघटनाच्या दिशेने ढकलला जातो.माणसांचा एकमेकांवरचा विश्वास उडत आहे.टोकाच्या वादाचे गारूड समाजावर फार काळ टिकत नाही.ठिकठिकाणी समाजनेत्यावर न्यायप्रक्रिया सुरू असले तरी अनेक नेत्यांचा ‘सुंभ जळला तरी पिळ जात नाही’ समाजाची विश्वासार्हता रसातळाला जात आहे याचे भान कोणत्याही समाजनेत्याला नसावे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकीकडे आपला नवा भारत आता जुन्या विचारांनी चालण्यास तयार नाही विषेशत: न्यू इंडियातील स्त्रिया आता पुढे येऊन त्यांच्या पुढील आव्हानांनाच आव्हान देत आहेत.आणि त्यामुळे काही समाजात सकारात्मक परिवर्तन घडतांना दिसत आहे.आज आपण 21 व्या शतकाकडे जगतो आहे. विज्ञान जगाचे पाईक आहोत.दुसरीकडे मात्र कंजरभाट समाजामध्ये 21 व्या शतकात जगणार्‍या महिलांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होत आहे.त्याच्यापेक्षा मोठा दुदैवी त्या महिलांच अशूच शकत नाही.

सध्याच्या घडामोडीवर जोपर्यंत समाजबांधव, महिला व युवा वर्ग एक मोठी चळवळ उभारून अंनिसच्या पदाधिकारी तसेच समाजाच्या विषयावर आवाज उठवणार्‍यासोबत चर्चा करीत नाही तोपर्यंत समाजात सकारात्मक परिवर्तन न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंचांचा मनमानी कारभार, पंचांची दुकानदारी या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न होणे नितांत गरजेचे आहे. परंतु हे फक्त पत्रकार, युवक आणि माध्यमे यांच्याकडून अपेक्षा होत आहे. मात्र, प्रत्येक समाजबांधवांची जबाबदारी आहे. तरच समाज प्रगतीपथावर येईल. पंचांनी आपल्या विचारांमध्ये बदल करण्याची गरज आहे. सध्या सुरू असलेल्या गट-तटामुळे समाजाचे नुकसान होत आहे. त्याची बाजू आपल्यासमोर मांडणे हा एकमेव उद्देश आहे.
– 8788632712

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या