जळगाव | Jalgaon
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) मंत्रालयात राज्यातील २९ महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण (Reservation) सोडत जाहीर करण्यात आली. यात जळगाव महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी राखीव निघाल्याने आता या पदावर नेमकी कुणाची वर्णी लागणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या नऊ महिला ओबीसी प्रभागातून विजयी झाल्याने नऊ पैकी कोणाला संधी मिळते याकडे नजरा लागून आहेत.
जळगाव महापालिकेच्या (Jalgaon Municipal Corporation) नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीला भरभरून यश लाभले. यात भारतीय जनता पक्षाला ४६, शिवसेनेने २२ तर राष्ट्रवादीला (NCP) एक जागा मिळाली. तर शिवसेना-उबाठाच्या पाच जागा निवडून आल्या असून, एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली. यानंतर काल गटांची नोंदणी झाल्यानंतर आज मुंबईत महापौरपदाचे आरक्षण हे ओबीसी महिलेसाठी निघाले. यानंतर आता जळगावच्या महापौरपदी कुणाची वर्णी लागणार ? याची चर्चा सुरू झाली आहे.
हे देखील वाचा : Mayor Reservation : नाशिक, मालेगाव, धुळे महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव; वाचा कोणत्या महापालिकेत कुठले आरक्षण?
महापालिका निवडणुकीत अनेक ओबीसी महिला (OBC Women) निवडून आल्या आहेत. यातील लेवा पाटीदार समाजातील महिलेला महापौरपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्वला बेंडाळे यांचे नाव आघाडीवर आहे. त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्या अतिशय निष्ठावंत कार्यकर्त्या असून, त्यांना महापालिकेचा चांगला अनुभव देखील आहे. यासोबतच प्रभाग सातमधून बिनविरोध निवडून आलेल्या दीपमाला मनोज काळे यांचे नाव देखील महापौरपदाच्या चर्चेत आहे. त्यांनी आधीच सभागृहात आपल्या कामाची छाप सोडली असून आता त्यांना महापौरपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
तसेच महापौरपदासाठी (Mayor Post) प्रभाग क्रमांक १२ मधून निवडून आलेल्या गायत्री इंद्रजीत राणे या देखील महापौरपदाच्या दावेदार आहेत. त्यांना देखील महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव असल्याने त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच माजी महापौर तथा पुन्हा निवडून आलेल्या जयश्री सुनील महाजन या देखील या पदाच्या दावेदार आहेत. त्या शिवसेना-उबाठा पक्षातून अलीकडेच भारतीय जनता पक्षात आलेल्या असल्या तरी महापौरपदी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांच्या नावाचा विचार होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर




