टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar
तालुक्यातील दत्तनगरसह ग्रामीण पाणीपुरवठा योजना तसेच जलजीवन मिशन अंतर्गत केली जाणारी कामे, गेल्या काही दिवसांपासून रखडली आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सदरच्या जलजीवन मिशन योजनेतील कामे पूर्ण न झाल्याने गावागावांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालून तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेबाबत सदर यंत्रणेची स्वतंत्र बैठक घेऊन, हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. संगीता शिंदे यांनी केली आहे.
तालुक्यामध्ये जलजीवन मिशन योजनेमार्फत सुमारे 43 गावांमध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर असून काही ठिकाणी त्याची कामे सुरू आहेत. तर काही ठिकाणी अद्याप निधी अभावी सुरू व्हायची आहेत. उंदीरगाव, खानापूर, उक्कलगाव, वांगी, भामाठाण, सराला, निमगाव खैरी, एकलहरे, घुमनदेव, गुजरवाडी, कारेगाव, खंडाळा, खिर्डी, वडाळा महादेव, पढेगाव, हरेगाव, मातुलठाण, भेर्डापूर, भैरवनाथनगर, नायगाव नवे, दिघी, माळवडगाव, लाडगाव, मालुंजे, बेलापूर खुर्द, गोंडेगाव, टाकळीभान, शिरसगाव अशा अनेक गावांचा या योजनेत समावेश आहे. त्याचबरोबर जलजीवन मिशन मार्फत कडीत, निपाणी वडगाव, खोकर, बेलापूर-ऐनतपूर, दत्तनगर, मुसळवाडी, टाकळीमिया या ठिकाणी जलजीवन मिशनची कामे मंजूर होऊन काही ठिकाणी कामे सुरू आहेत. परंतू ही कामे कासवगतीने सुरू असल्याने योजना पूर्ण होण्यास वेळ लागत आहे.
एकाच ठेकेदाराला दहा ते बारा ठिकाणची कामे दिलेली असल्याने त्यांची अपुरी यंत्रणा सर्व ठिकाणी व्यवस्थित काम करू शकत नाही. त्यामुळे कामे पूर्ण होण्यास उशीर लागत आहे. दत्तनगर पाणीपुरवठा योजनेच्या 29 कोटी रुपयांच्या योजनेचे 30 टक्के काम झाले आहे. 70 टक्के काम कधी पूर्ण होईल, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. दरम्यान जलजीवन मिशनच्या अधिकार्यांकडे याबाबत विचारणा केली असता, सदर योजना मंजूर असल्या तरी त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने ही कामे पुढे मार्गस्थ होत नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या यंत्रणेने शासनाकडे निधीची मागणी करून लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, संबंधीत गावाच्या ठेकेदारांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आतापर्यंत जेवढी कामे केली त्याप्रमाणात निधी उपलब्ध नसल्याने ही कामे संथगतीने सुरू आहेत. योजना कार्यान्वित होण्यासाठी लाखो रुपये स्वत: खर्च केले आहेत. तसेच पाणीपुरवठा योजना राबवित असताना स्थानिक पातळीवर अनेक अडचणी निर्माण होत आहे. तरी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यात लक्ष घालून या योजनेंच्या कामांना गती द्यावी, अशी मागणी सौ. शिंदे यांनी केली आहे.