जामखेड (तालुका प्रतिनिधी)
जामखेड शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील ‘हॉटेल न्यु कावेरी’ येथे केवळ जेवणाच्या बिलाच्या किरकोळ वादातून नऊ जणांच्या टोळक्याने हॉटेलची तोडफोड करत हॉटेल चालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. विशेष म्हणजे, याच हॉटेलमध्ये आठ दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास हॉटेल चालक मोहित पवार आणि आरोपी ऋषिकेश विटकर यांच्यात जेवणाच्या बिलावरून शाब्दिक चकमक झाली होती. या वादाचा राग मनात धरून, त्याच दिवशी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आरोपींनी आपल्या साथीदारांसह हॉटेलवर हल्ला चढवला. आरोपींनी हॉटेलमध्ये शिरताच आरडाओरडा करत हॉटेलच्या काचा फोडल्या आणि खुर्च्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. यावेळी हॉटेलचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हॉटेलची तोडफोड होत असल्याचे पाहून फिर्यादी सिद्धेश पवार हे आरोपींना रोखण्यासाठी गेले. मात्र, संतापलेल्या रवी भगवान पवार याने आपल्या हातातील लोखंडी कोयत्याने सिद्धेश यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात सिद्धेश गंभीर जखमी झाले असून, इतर आरोपींनी त्यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या हिंसक हल्ल्यात सिद्धेश पवार यांच्या डोक्याला आठ आणि मनगटाला सहा, असे एकूण १४ टाके पडले आहेत. त्यांच्यावर सध्या जामखेड येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
याप्रकरणी सिद्धेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ऋषिकेश अजिनाथ विटकर, रवी भगवान पवार, राहुल साळुंखे, चेतन साळुंखे (चौघेही रा. भुतवडा), शुभम साळुंखे (रा. गोडाऊन गल्ली, जामखेड) आणि इतर चार अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे.
हॉटेल न्यु कावेरी हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वीच काही गुंडांनी या हॉटेलवर गोळीबार केला होता. त्या गोळीबारात फिर्यादीचा भाऊ रोहित अनिल पवार हा गंभीर जखमी झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच हॉटेलवर झालेला हा दुसरा मोठा हल्ला पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
जामखेड शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे करत आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.




