Monday, May 27, 2024
Homeनगरधनगर आरक्षणप्रश्नी चौंडीत पुन्हा आमरण उपोषण सुरू

धनगर आरक्षणप्रश्नी चौंडीत पुन्हा आमरण उपोषण सुरू

अहमदनगर / जामखेड – (प्रतिनिधी)

धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमाती करत तसे आरक्षण जाहीर करण्यासाठीची ५० दिवसांची अंमलबजावणी मुदत संपली आहे. याबाबत सरकारकडून लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्याने यशवंत सेनेने चौंडी (ता जामखेड) येथे शुक्रवारपासून (दि.१७) पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

- Advertisement -

यासंदर्भात यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले, धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणीच्या मागणीसाठी यशवंत सेनेच्यावतीने चौंडी येथे सप्टेंबरमध्ये २१ दिवसांचे उपोषण झाले. त्यावेळी राज्य शासनाने यशवंत सेनेला ५० दिवसांत आरक्षण अंमलबजावणी करण्याचे लेखी पत्र दिले होते. मात्र, प्रत्यक्षात संपलेल्या ५० दिवसांत आरक्षण अंमलबजावणी संदर्भात राज्यशासनाने काहीच निर्णय घेतला नाही. उपोषाणकर्त्यांबरोबर बैठक घ्यायची, चर्चा करायची, परंतु कृती काहीच करायची नाही, असा लबाडीचा खेळ राज्य सरकारकडून सुरू असल्याचा आरोप दोडतले यांनी केला. त्यामुळे यशवंत सेनेने पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग निवडला आहे. यावेळी स्वतः बाळासाहेब दोडतले, मागील उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर, सुरेश बंडगर उपोषणास बसले असून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव दांगडे पाटील म्हणाले, ५० दिवसात आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी शासन निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमून केंद्र सरकारला शिफारश करु व दोन महिन्यांत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन आरक्षणाची अमलबजावणी करण्याचे तसेच चार राज्यांचा आरक्षण अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र कमिटी नेमण्याची व राज्यातच शासन निर्णय काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, यातील काहीही झाले नाही. एकूणच राज्य सरकार धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे. यावेळी प्रदेश अध्यक्ष माणिकराव दागडे पाटील, प्रा. आण्णासाहेब रुपनवर, नितीन धायगुडे, किरण धालपे, बाळा गायके, दत्ता काळे, स्वप्निल मेमाणे, अक्षय शिंदे, कृष्णा बोबडे, आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या