जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
आमची गावातील दहशत संपविण्याची भाषा करता, त्यापेक्षा आम्हीच तुमची दहशत संपवतो असे म्हणत 14 जणांच्या टोळक्याने तलवार, कोयता, लोखंडी गज व काठ्यांनी सात जणांवर हल्ला चढवला, या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला 14 जणांवर खुनाचा प्रयत्न करणे व अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी वैभव विजय साबळे, सार्थक विजय साबळे, अभय कृष्णाराजे भोसले, ओम चंद्रकांत गोरे, विजय शंकर साबळे, साईनाथ शंकर रजपूत, नरेंद्र शहाजी सोनवणे, कल्याण पांडुरंग मोहळकर, सोमनाथ काशिनाथ शिंगटे, (रा. सर्व नान्नज ता.जामखेड), निलेश ज्ञानदेव माने, किरण रावसाहेब जगदाळे, (दोघे रा. महारूळी ता. जामखेड), हर्षद प्रताप काकडे (रा. बोर्ले ता. जामखेड) व इतर दोन अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवार दि. 24 ऑगस्ट रोजी फिर्यादी अभिजीत संपत साळवे हा घरी असताना त्यास त्याचा भाऊ यशदिप संपत साळवे यांने फोन करून सांगितले की, नान्नज बाजार तळावर वरील आरोपींनी मला मारहाण केली आहे. यावेळी अभिजित तातडीने नातेवाईकांसह घटनास्थळी आला. त्यावेळी फिर्यादीचा भाऊ गंभीर जखमी झालेला होता. त्यामुळे त्यास जामखेड येथील रूग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने जखमी यशदिप साळवे यास पुढील उपचारासाठी नगर येथे घेऊन जायचे होते. त्यामुळे फिर्यादी हा आपल्या नातेवाईकांसमवेत गावातील सद्दाम लतीफ पठाण यांच्या चारचाकी गाडीतून नान्नजहुन जामखेडकडे जात असताना गावाजवळच वरील आरोपींनी फिर्यादीची गाडी अडवून गाडीच्या काचा फोडून गाडीतील नातेवाईकांना मारहाण केली.
त्यामुळे आरोपी वैभव साबळे म्हणाला की, तुम्ही काय आमची दहशत संपवता, तुम्ही गाव बंद करून, भाषणे करून आमची दहशत संपविण्याची भाषा करता त्यापेक्षा आम्हीच तुम्हाला मारून टाकतो. असे म्हणत फिर्यादीवर तलवार व कोयत्याने हल्ला चढवत गंभीर जखमी केले. या मारहाणीत फिर्यादी अभिजीत साळवे, यशदिप साळवे, आदर्श सुनील साळवे, दिग्विजय आबू सोनवणे, गाडी चालक सद्दाम लतीफ पठाण, रतन साळवे व रेषमा साळवे (सर्व रा. नान्नज) असे सात जण या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी भेट दिली. वरील घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे करत आहेत. या प्रकरणी एका आरोपीस पोलीसांनी अटक केली असून इतर आरोपींच्या शोधासाठी पोलीसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.




