जामखेड । तालुका प्रतिनिधी
जामखेड येथील एसटी महामंडळाच्या बस आगारात डिझेलच्या तुटवड्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांचे हाल होत आहेत. “प्रवाशांच्या सेवेसाठी” हे ब्रीदवाक्य असलेल्या या आगारात डिझेलअभावी ११ ऑगस्टपासून दुपारनंतर सर्व बस जागेवर उभ्या राहिल्या. यामुळे शहरी आणि ग्रामीण मार्गांवरील बससेवा ठप्प झाली, आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
जामखेड बसस्थानक हे चार जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने येथे बसांची ये-जा मोठ्या प्रमाणात होते. आगारात एकूण ५१ बस असून, पुणे, मुंबई, बारामती, करमाळा, नाशिक, कोल्हापूर, सातारा, नगर आदी ठिकाणी या बस धावतात. यामुळे बसस्थानक २४ तास प्रवाशांच्या सेवेत असते. “जामखेडला गेलं की बस नक्की मिळते,” असा प्रवाशांचा समज आहे. अनेकजण रात्रभर बसस्थानकात थांबतात, त्यामुळे परिसरातील हॉटेले आणि दुकानेही सतत सुरू असतात.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून डिझेलच्या कमतरतेमुळे चालक आणि वाहकांना त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी डिझेल उपलब्ध नसल्याने बससेवा विलंबाने सुरू होतात. १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत डिझेलचा टँकर आगारात पोहोचला नव्हता. यामुळे बस बंद राहिल्याने आगाराच्या लाखो रुपयांच्या दैनंदिन उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
या समस्येचे मूळ आहे चुकीचे नियोजन. डिझेलअभावी बस डेपोतच उभ्या राहणे हे एसटी महामंडळाच्या गलथान कारभाराचे द्योतक आहे. डिझेलचे वाढते दर आणि खराब रस्त्यांमुळे बसचा खर्च वाढला आहे. आगाराला डिझेलचा टँकर मिळवण्यासाठी स्वतःच्या उत्पन्नावर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे आर्थिक तारेवरची कसरत करावी लागते. या गोंधळामुळे प्रवाशांना तासन्तास इतर ठिकाणांहून येणाऱ्या बसची वाट पाहावी लागत आहे.
अनेक प्रवासी रात्रभर बसस्थानकात थांबूनही बस मिळत नसल्याने निराश होत आहेत. या नुकसानीस जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. डिझेलच्या तुटवड्यामुळे प्रवाशांचे हाल आणि महामंडळाचे आर्थिक नुकसान याला आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे.





