घोटी | जाकीरशेख
इगतपुरी पंचायत समितीच्या सभापतीपदी खेड गणाच्या सदस्या जया रंगनाथ कचरे यांची बिनविरोध वर्णी लागली आहे तर उपसभापती पदी वाडीवऱ्हे गणाच्या सदस्या जिजाबाई राजाराम नाठे यांची निवड झाली.
10 सदस्यांपैकी 7 सदस्य एकट्या शिवसेनेचे असून पंचायत समितीवर शिवसेनेची अबाधित सत्ता आहे. इंदिरा काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षांचे प्रत्येकी 1 सदस्य आहेत. बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अर्चना पागिरे यांनी केल्यानंतर समर्थकांनी जल्लोष केला. इगतपुरी पंचायत समितीमध्ये ह्या निवडणुकीनिमित्ताने सर्वांनी आघाडी करून खेळीमेळीचे वातावरण निर्माण केले.
इगतपुरी पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आज इगतपुरी येथे निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. सभापती पद अनुसूचित जमाती साठी आरक्षित असल्याने शिवसेनेच्या खेड गणाच्या सदस्या जया रंगनाथ कचरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
उपसभापती पदावर शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजाराम नाठे यांच्या सौभाग्यवती तथा वाडीवऱ्हे गणाच्या सदस्या जिजाबाई राजाराम नाठे यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेना नेत्या माजी आमदार निर्मला गावित, राजाभाऊ वाजे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी तालुकाप्रमुख राजाराम नाठे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी शिवसेना नेते कुलदीप चौधरी, कचरू पाटील डुकरे, हरिभाऊ वाजे, मोहन बऱ्हे, समाधान वारुंगसे, साहेबराव झनकर, शिवाजी काळे, गणेश टोचे, रघुनाथ तोकडे, रमेश धांडे, अनिल भोपे, कैलास कडू, संदीप जाधव, संदीप खराटे, नामदेव साबळे, भाऊसाहेब वाजे, सुदाम भोसले, भास्कर वाजे, रमेश गव्हाणे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे यावेळी मावळत्या सभापती कल्पना हिंदोळे, मावळते उपसभापती भगवान आडोळे, गटनेते विठ्ठल लंगडे, पंचायत समिती सदस्य विमल तोकडे, विमल गाढवे, सोमनाथ जोशी, कौसाबाई करवंदे, मश्चिंद्र पवार उपस्थित होते.
इगतपुरी तालुक्याच्या विकासासाठी अविरत कार्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करील. आमचे मार्गदर्शक माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे आणि शिवसेना नेत्यांचे मार्गदर्शन घेऊन विकासाचा रथ पुढे नेईल. जनतेला आश्वस्त करून उत्तरदायित्व पार पाडणार आहे.
– जया कचरे, नूतन सभापती इगतपुरी