मुंबई | Mumbai
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. निवडणूक प्रक्रियेतील शंका, मतदार यादीतील त्रुटी व निवडणुकीच्या पारदर्शकतेसंबंधी मुद्दे उपस्थित केले आहेत. आज राज्य निवडणूक आयोगासोबत (Maharashtra Election Commission) बैठक झाल्यानंतर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीकेचे बाण सोडले. तसेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा दाखला देत कोणत्या मतदारसंघात मतदार वाढले हे देखील सांगितले. यात नाशिक शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख देखील राष्ट्रवादीचे (श.प) पक्षाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला.
ते म्हणाले की, “काल आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेऊन त्यांना अनंत चुका दाखवल्या. यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की, केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमचं सगळं म्हणणं आम्ही पाठवतो. या याद्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर सुरुवात करतो. दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र निवडणूक आयोग आहे. त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत असं काही सुचवल्यामुळे आज त्याबाबतचे प्रश्न राहिल्याने आम्ही त्यांची भेट घेतली कालप्रमाणे आजही सर्व विरोधी पक्ष नेते तिथे गेले. काही महत्त्वाचे पुरावे निवडणूक आयोगाला दाखवले आणि त्या पुराव्यांच्या सहित आज त्यांना काही माहिती दिली. आम्ही त्यांना पत्र ही दिलेले आहे. पत्र देत असताना मतदार यादीतील मतदारांचे मोठ्या प्रमाणावर पत्ते अपूर्ण आहेत. काही प्रमाणात चुकीचे टाकलेले आहेत. त्याचबरोबर मतदार यादीत असलेल्या पत्त्यावर तो मतदार राहत नाही. त्यातील काही उदाहरणे त्यांना दिली आहेत असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “निवडणूक आयोगाला १२ ऑगस्टला आम्ही पत्र दिलं त्याची दखल घेतली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगालाही दिली, सोईचे ठेवतात गैरसोईचे काढत आहेत. हे सर्व कुणीतर मोनिटर करत असल्याचे निदर्शनास आले. पण तक्रार केली, तर दखल नाहीच. आता हे चालणार नाही, असे करून निवडणूका वेगळ्या दिशेने नेल्या जात आहेत. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात ( Nashik Central Assembly Constituency) घर क्रमांक ३ हजार ८२९ मध्ये ८१३ लोकं दाखवलेले आहेत. सुषमा गुप्ता यांचे नाव दुपारी नालासोपारा होतं. ते सायंकाळी ६ वाजता काढले होते, याची चौकशी झालेली नाही. मुरबाडमध्ये मतदारांच्या घरापुढे डॅश – आहे असे ४०० लोकं आहे. पुण्यात ८७९ लोकं आहेत. हे पुरावे असून, आम्ही हवेत बोलत नाही. राष्ट्रवादीच्या अशोक पवार यांनी शिरूर गावात काही प्रश्न उपस्थित केले. घर क्रमांक १ मध्ये ८८८ लोकं दाखवलेत. लेखी तक्रार केल्यावर मतदारांच्या गोपनियतेचे कारण देत माहिती दिलेली नाही”, असे जयंत पाटील यांनी म्हटले.





