पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
राज्य सरकारच्यावतीने शिर्डी येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला. या कार्यक्रमाला महिलांना घेऊन जाण्यासाठी एसटी बसेसचा वापर करण्यात आल्याने शिक्षणासाठी एसटीने प्रवास करणारे विद्यार्थी रस्त्यावर ताटकळत राहावे लागले. सरकारच्या सत्तेच्या गैरवापराला पारावार राहिला नसून सरकार आपल्या दारी या कार्यक्रमासाठी महिनाभर दाखले रखडविण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी केला.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यावतीने काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा निघोजमध्ये पोहोचल्यानंतर मळगंगा मंदिरासमोर झालेल्या सभेमध्ये आ. पाटील बोलत होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे, खा. नीलेश लंके, महेबूब शेख, राहुल जगताप, स्वप्निल गायकवाड, अतुल लोखंडे, राणीताई लंके, शिवाजीराव लंके उपस्थित होता. यावेळी आ. पाटील म्हणाले, पारनेर-नगर मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यायची ते तुम्ही सर्वानुमते ठरवा. खा. लंके यांनी उमेदवाराचे नाव उखाण्यात घ्यावे.
मी त्यांच्या एबी फॉर्मवर लगेच सही करतो, असे म्हणताच एकच हशा पिकला. आ. पाटील म्हणाले, आमच्याकडे कोणी येण्यास तयार नव्हते, त्यावेळी लंके आमच्या पक्षात आले. त्यांनी कोणत्या ज्योतिषाकडे पाहिले हे माहिती नाही, परंतु त्यांनी सुरूवात केली आणि राज्यभरातून पक्षात इन्कमींग सुरू झाले.