लोणी |वार्ताहर| Loni
विकसित भारत जी राम जी योजनेत विविध विभागातील योजना एकत्र करून गाव विकसित करायचे आहे. वर्षाला 125 दिवस शाश्वत रोजगार आणि पारदर्शक काम करून गावांचा चेहरा आणि गावकर्यांचे भाग्य बदलण्यासाठी ही योजना ब्रम्हास्र ठरेल, असा विश्वास केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला. दरम्यान लोणी बुद्रुक, जि.अहिल्यानगर येथील विशेष ग्रामसभेचे देशातील 2 लाख 86 हजार गावांमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात आले.
ग्रामीण जनतेचे रोजगार आजिविका विविधिकरण व सामाजिक आर्थिक सक्षमीकरण अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने मनरेगा या योजनेऐवजी विकसित भारत: रोजगार आणि अजिवीका गारंटी मिशन अधिनियम 2025 मंजूर केले आहे.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेऐवजी व्हीबी-जी राम-जी ही योजना अस्तित्वात येत आहे. या योजनेची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीने लोणी बुद्रुक येथे विशेष ग्रामसभेचे गुरुवार 1 जानेवारी रोजी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान हे ग्रामसभेला उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सरपंच कल्पना मैड होत्या. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, केंद्रीय ग्रामविकास सहसचिव रोहिणी भाजीभाकरे, योजनेचे सचिव गणेश पाटील, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, निखिल ओसवाल, नितीन दिनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ना.चौहान यांनी विकसित भारत जी राम जी योजनेची सखोल माहिती दिली. ते म्हणाले, यापूर्वी नरेगा, मनरेगा नावाने अशी योजना आली. त्यात अपेक्षित रोजगार मिळाला नाही. भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली. निधी कामांवर योग्य प्रकारे खर्च न झाल्याने गावांचा विकास झाल्याचे दिसून आले नाही. योजना दिल्ली, मुंबईतून चालवली जात होती. नव्या विकसित भारत जी राम जी योजनेत मूलभूत बदल करून पारदर्शकता आणली आहे. ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांना अधिकार देण्यात आले आहेत. कामाचा आराखडा ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन तयार करायचा आहे.
कामावर गावकर्यांनी लक्ष ठेवायचे आहे. मनरेगा अंतर्गत 100 दिवस रोजगाराची तरतूद होती ती नव्या योजनेत 125 दिवस केली आहे. रोजगाराचे पेमेंट आठ दिवसात मिळेल. विलंब झाल्यास भरपाई दिली जाईल. जलसंधारण, पायाभूत सुविधा, बचत गटाच्या महिला यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, नैसर्गिक आपत्तीपासून बचावसाठीची कामे केली जाणार आहेत. रोजगार सहायकांच्या नोकरीला संरक्षण, कामाची जबाबदारी सांभाळणारे कर्मचार्यांसाठी मोबदला सहा टक्क्यांहून नऊ टक्के करण्यात आला आहे. योजनेत 33 टक्के महिलांना रोजगार देण्याची तरतूद केली आहे. मनरेगासाठी 88 हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती ती नव्या योजनेत 1 लाख 51 हजार कोटी करण्यात आली आहे. पाच वर्षात या योजनेसाठी 8 लाख कोटी मिळणार असून देशातील ग्रामपंचायतींची संख्या लक्षात घेतली तर प्रत्येक ग्रामपंचायतीला 3 कोटी मिळू शकतात.
ते पुढे म्हणाले, शेतकर्यांच्या पीक पेरणी व सोंगणीच्या काळात मजुरांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून या योजनेचे काम 60 दिवस थांबविण्यात येईल व याचे नियोजन राज्य सरकार करेल. केंद्र सरकारने केलेला कायदा राज्य सरकारांना बंधनकारक आहे. केंद्र सरकार शेतकरी हिताचे आणखी कायदे लवकरच करणार असून त्यात सदोष बियाणे आणि बनावट कीटकनाशक औषधे कायद्याचा समावेश असेल. शेतकर्यांना फळबागांसाठी सदोष रोपे दिली जातात, त्यातून मोठे नुकसान होते. यासाठी केंद्र सरकार देशात रोपवाटिका तयार करणार असून महारष्ट्र तीन रोपवाटिका दिल्या जाणार आहेत. त्यातील एक लोणी येथे देऊ, अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी महिला, ग्रामपंचायतीचे सरपंच, शेतकरी, नागरिक यांनी कृषी मंत्र्यांशी संवाद साधत प्रश्न विचारले. त्यांना ना. चव्हाण यांनी समर्पक उत्तरे देत शंकांचे समाधान केले.
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रास्ताविक करताना सांगितले, लोणी बुद्रुक गावासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. देशातील एका महत्त्वपूर्ण योजनेच्या जनजागृतीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची संधी सहकार भूमी असलेल्या गावाला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार व्यक्त करीत ते म्हणाले, या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार आपल्या सर्वांना होता आले. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी गाव विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना सुरू केल्या असून त्यातून प्रत्येक घटकाला स्वावलंबी होण्याची संधी मिळत आहे.
सहसचिव रोहिणी भाजीभाकरे यांनी पावर प्रेझेंटेशन द्वारे योजनेची सखोल माहिती उपस्थितांना दिली. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी स्वागत केले. अनिल विखे यांनी आभार मानले. सभेला लोणी बुद्रुकचे ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील गावांचे सरपंच, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामसभेला महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.




