रांची । Ranchi
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांसाठी तर उर्वरित ३८ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला महाराष्ट्रासह झारखंड निवडणुकीचाही निकाल लागणार आहे.
पहिल्या टप्प्यात ६८३ उमेदवार निवडणुकच्या रिंगणात आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यासह अनेक नेतेमंडळी निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. पहिल्या टप्प्यातील विधानसभेच्या ४३ जागांपैकी १७ सर्वसाधारण, तर २० जागा अनुसूचित जमातीसाठी आणि ६ जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. तसेच यामध्ये ७३ महिला उमेदवारांचाही समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी १५३४४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. निष्पक्ष, पारदर्शक आणि शांततेत मतदान व्हावे यासाठी केंद्रीय निमलष्करी दलाच्या २०० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात कोडरमा, बरकाथा, बार्ही, बरकागाव, हजारीबाग, सिमरिया, चतरा, बहरगोरा, घाटशिला, पोटका, जुगसलाई, जमशेदपूर पूर्व, जमशेदपूर पश्चिम, इचगढ, सरायकेला, चाईबासा, माझगाव, जगन्नाथपूर, मनोहरपूर, चक्रधरपूर, खरसंपवा, खरसांग, ता. रांची, हटिया, कानके, मंदार, सिसाई, गुमला, विशुनपूर, सिमडेगा, कोलेबीरा, लोहरदगा, मनिका, लातेहार, पंकी, डाल्टनगंज, विश्रामपूर, छतरपूर, हुसेनाबाद, गढवा, भवनाथपूर यांसह इतर मतदारसंघात मतदान घेतले जात आहे.
दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र यांनी की, “झारखंड विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आज पहिली फेरी आहे. लोकशाहीच्या या उत्सवात मी सर्व मतदारांना पूर्ण उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन करतो. या निमित्ताने मी माझ्या सर्व तरुण मित्रांचे अभिनंदन करतो जे पहिल्यांदाच मतदान करत आहेत! लक्षात ठेवा – प्रथम मतदान, नंतर अल्पोपाहार!”
तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले की, “झारखंडच्या बंधू आणि भगिनींनो, आज तुमच्या जागी पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. मी तुम्हा सर्व मतदारांना आवाहन करतो की, तुमच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि संविधान आणि लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा. भारताला दिलेले तुमचे प्रत्येक मत तुमच्या जीवनात 7 हमींच्या माध्यमातून समृद्धी आणेल, जल-जंगल-जमिनीचे संरक्षण करेल आणि सामाजिक न्याय मजबूत करेल.”