तीन दिवसात सादर होणार 21 एकांकीका
नंदुरबार । प्रतिनिधी – येथे संत गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे यांच्यातर्फे एम स्क्वेअर वेल्थ मॅनेजमेंट नाशिक प्रायोजित जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेला दि.3 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातून 21 नाट्यसंस्थांचा सहभाग राहणार आहे, अशी माहिती आज स्पर्धेचे आयोजन नागसेन पेंढारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री.पेंढारकर म्हणाले, दि.3, 4 व 5 जानेवारी 2020 दरम्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात होत असलेल्या सदर स्पर्धा राज्यपुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर उर्फ जिभाऊ यांच्या स्मरणार्थ गेल्या नऊ वर्षापासून संपन्न होत आहेत.
या स्पर्धेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील रसिक श्रोत्यांना दरवर्षी एकांकीकेची मेजवानी मिळत असते. राज्यभरातून विविध नाट्यसंस्था या स्पर्धेत सहभागी होतात. यावर्षी इंदौरसह (मध्यप्रदेश) मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमळनेर, जळगांव, भुसावळ, धुळे, चोपडा, एरंडोल, उल्हासनगर या शहरातील नाट्यसंस्थांतर्फे एकुण 21 एकांकीका सादर होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन दि.3 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हा कल्चरल अॅकेडमीचे अध्यक्ष मनोज रघुवंशी यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यीक दिनानाथ मनोहर, सिने दिग्दर्शक शाम रंजनकर, उद्योजक आनंद जैन, किरण तडवी, मिलिंद पहुरकर, शितलभाई पटेल, नवोदय विद्यालयाचे सुरेंद्र देवरे, नगरसेवक रविंद्र पवार, डॉ.राजकुमार पाटील, संजय चौधरी, पत्रकार रमाकांत पाटील, रणजीत राजपूत, नरेश नानकानी, रोटरी नंदनगरीचे अध्यक्ष प्रितिष बांगड उपस्थित राहणार आहेत.
दि.5 जानेवारी 2020 रोजी दुपारी 1 वाजता मागील नऊ वर्षाचे परिक्षकांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यात अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी, गंगाराम गवाणकर, नाट्य प्रशिक्षक शिवदास घोडके, सिने तथा नाट्य अभिनेता आत्माराम बनसोडे, सिने दिग्दर्शक शाम रंजनकर, सिने अभिनेत्री निला गोखले, नाटककार कुंदा निलकंठ, सिने अभिनंता वीरा साथीदार, अॅकेडमी ऑफ थिएटर आर्टस् मुंबई विद्यापीठाचे डॉ.मंगेश बनसोडे, प्रसारण मंत्रालयाचे डॉ.जितेंद्र पानपाटील, मराठवाडा विद्यापीठाचे माजी नाट्यशास्त्र विभाग प्रमुख शशिकांत बर्हाणपूर यांचा सहभाग असणार आहे. याच मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी 2 वाजता बक्षिस वितरण समारंभ पार पडणार आहे.
जिभाऊ करंडक आयोजन समितीतर्फे दरवर्षी दिला जाणारा दीपस्तंभ हा पुरस्कार यावर्षी शहादा येथील रंगश्री गृपचे संस्थापक ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ.शशांक कुलकर्णी यांना प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धे दरम्यान मुंबई येथील सुप्रसिद्ध हास्य कलाकार विलासकुमार शिरसाठ यांची तुफान स्टॅडअप कॉमेडी दि.5 जानेवारी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता नंदुरबार येथील डॉक्टरांनी तयार केलेला हिंदी लघुपट काश याचे प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जिभाऊ करंडक आयोजन समितीतर्फे आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवसात सादर होणार्या एकांकीकांचे परीक्षण नाटककार अजित भगत, नाट्य दिग्दर्शक तथा लेखक दत्ता पाटील, नाटककार रविंद्र लाखे हे करणार आहेत.
या जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेच्या माध्यमातून शहरवासियांना एकांकीकेची मेजवानी या तीन दिवसात मिळणार आहे. म्हणून जास्तीत जास्त नाट्यरसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन नागसेन पेंढारकर, मनोज पटेल, मनोज सोनार, राजेश जाधव व समस्त जिभाऊ करंडक आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.