मुंबई | Mumbai
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या बहुप्रतीक्षित प्रारंभिक समभाग विक्रीला (IPO) शेअर बाजारात जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. बोली सुरू झाल्यानंतर अवघ्या १०० मिनिटांतच IPO पूर्णपणे सबस्क्राइब झाला, अशी माहिती समोर आली आहे. सुमारे ३०,२१३ कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट असलेल्या या IPOने भारतीय शेअर बाजारातील मोठ्या सार्वजनिक समभाग विक्रींच्या तुलनेत वेगवान सुरुवात केली आहे.
मोठ्या भारतीय आयपीओंच्या तुलनेत ही विक्रमी गती आहे. सकाळी 10:45 वाजता, म्हणजेच बोली सुरू झाल्यानंतर सुमारे 100 मिनिटांतच, एकूण ऑफर केलेल्या शेअर्सच्या 101 टक्के बोली मिळाल्या होत्या. यामध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (QIBs) आघाडी घेतली असून, त्यांच्यासाठी राखीव असलेल्या भागाला ३3.25 पट जास्त बोली मिळाली. हा भारतीय भांडवली बाजारातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असून, यात कोणताही ‘ऑफर-फॉर-सेल’ (OFS) भाग नाही, तर सर्व शेअर्स पूर्णपणे नवीन (fresh issue) आहेत. कंपनी या निधीचा मुख्य वापर आपले कर्ज फेडण्यासाठी करणार आहे.
संस्थात्मक गुंतवणूकदारांचा पुढाकार
सुरुवातीच्या 30 मिनिटांतच QIB चा कोटा पूर्ण भरला होता. सकाळी पावणे अकरापर्यंत या श्रेणीतील मागणी 3.25 पटीवर पोहोचली होती. इतर श्रेणींमध्ये मात्र सुरुवातीला कमी प्रतिसाद होता; अनिवासी गुंतवणूकदारांच्या (NII) कोट्यासाठी 27 टक्के, तर किरकोळ (retail) गुंतवणूकदारांच्या कोट्यासाठी 24 टक्के बोली लागल्या होत्या. तसेच, कर्मचाऱ्यांच्या कोट्याला 59 टक्के आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जुन्या भागधारकांसाठी असलेल्या भागाला 45 टक्के प्रतिसाद मिळाला.
कंपनीने प्रति शेअर 1,065 ते 1,119 रुपये असा प्राइस बँड निश्चित केला आहे. IPO मध्ये एका लॉटमध्ये 12 शेअर्स असतील. त्यामुळे वरच्या प्राइस बँडनुसार किरकोळ गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी किमान 13,428 रुपये गुंतवावे लागतील. सार्वजनिक गुंतवणुकीसाठी हा इश्यू 23 ऑक्टोबरपर्यंत खुला राहणार असून, शेअर्सचे लिस्टिंग 28 ऑक्टोबरला BSE आणि NSE वर होण्याचं नियोजन आहे. हे वेळापत्रक अंतिम प्रक्रियेच्या अधीन असेल.
ग्रे मार्केटमध्ये किती प्रीमियमचा दावा?
IPO उघडण्यापूर्वी Jio Platforms च्या शेअर्सबाबत ग्रे मार्केटमध्ये उत्सुकता दिसत आहे. विविध IPO ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मवरील आकडेवारीनुसार, कंपनीच्या शेअर्सचा ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजेच GMP 22 ते 23 टक्क्यांच्या आसपास असल्याचा दावा करण्यात आला आहे. Investorgain ने 247 रुपयांचा GMP नोंदवला, तर IPO Watch ने 23.2 टक्के प्रीमियमचा उल्लेख केला.
मात्र, ग्रे मार्केटमधील व्यवहार हे अधिकृत शेअर बाजाराबाहेर होतात. त्यामुळे GMP हा केवळ बाजारातील संभाव्य अपेक्षांचा संकेत आहे. लिस्टिंगच्या दिवशी शेअर याच प्रीमियमवर सूचीबद्ध होईल, याची कोणतीही हमी नसते. मागणी, बाजाराची परिस्थिती आणि गुंतवणूकदारांचा प्रतिसाद यांचा प्रत्यक्ष लिस्टिंगवर परिणाम होऊ शकतो.
IPO मधून मिळालेल्या पैशांचं काय होणार?
Jio Platforms ही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दूरसंचार आणि डिजिटल व्यवसायांची होल्डिंग कंपनी आहे. यामध्ये Reliance Jio Infocomm चा समावेश होतो. जून 2026 पर्यंत कंपनीचे ग्राहक 534 दशलक्षांहून अधिक असल्याचं दिलेल्या माहितीत नमूद आहे. मोबाईल सेवांव्यतिरिक्त ब्रॉडबँड, डिजिटल मनोरंजन, क्लाउड आणि AI आधारित सेवांमध्येही कंपनी विस्तार करत आहे.
IPO मधून मिळणाऱ्या निधीचा वापर दूरसंचार उपकंपनी Reliance Jio Infocomm चं कर्ज फेडण्यासाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी केला जाणार असल्याचं ऑफर दस्तऐवजांत नमूद आहे. नेटवर्क विस्तार आणि नव्या डिजिटल सेवांवरील गुंतवणूक सुरू ठेवतानाच कंपनी नफा, रोख प्रवाह आणि कर्ज कमी करण्याचा समतोल कसा राखते, याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष असेल.
रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी Moneycontrol ला दिलेल्या मुलाखतीत IPO ला कंपनीच्या विकासातील नव्या पर्वाची सुरुवात म्हटलं आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर भागधारक, ग्राहक, कर्मचारी आणि इतर संबंधित घटकांप्रती कंपनीची जबाबदारी वाढेल, असंही त्यांनी नमूद केलं.



