Wednesday, May 29, 2024
Homeनगरनोकरीच्या आमिषाने 86 लाखांची फसवणूक

नोकरीच्या आमिषाने 86 लाखांची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तरुणांना नोकरी लावून देण्याच्या आमिषाने सुमारे 86 लाख 28 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या संदर्भात श्रीगोंदा तालुक्यातील सौरभ शिंदे यांनी फिर्याद दिली असून दिनेश बबनराव लहारे (हनुमान नगर अरणगाव), रमजान अल्लाबक्ष शेख (रा.टाकळी खातगाव, ता.नगर) आणि जावेद पटेल (रा.गंगापुर,ता.गंगापुर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

या संदर्भात अधिक माहिती अशी, शिंदे हे बेरोजगार असून त्यांनी सैन्यदलात नोकरी लागण्यासाठी कराड येथील अ‍ॅकडमीत प्रवेश घेतला होता. पण नोकरी लागली नाही. आरोपी लहारे व शेख यांचे श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव जाणे, येणे होते. त्यामुळे त्यांची ओळख झाली होती. आरोपी शेख याने सौरभ शिंदे याला तुला नोकरी लावुन देतो पण पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्यावरुन फिर्यादी शिंदे यांनी आरोपीला वेळोवेळी 15 लाख रुपये दिले. आरोपी शेख याला लहारे व पटेल यांनी साथ दिली.

पैसे घेवुन नोकरी तर दिलीच नाही, तसेच पैसेही परत केले नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे. पैसे घेताना शिंदे व त्याच्या मित्राला मंत्रालयात, जिल्हा रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दिले होते. जिल्हा रुग्णालय तसेच सार्वजनिक आरोग्य विभागात नोकरीचे बनावट नियुक्ती पत्रही दिले होते. नियुक्तीचे पत्र दिल्याने शिंदे यांचा विश्वास बसला त्यांनी त्यांचे मित्र स्वप्नील शिंदे, (4 लाख), कुलदिप लगड (4 लाख 60 हजार), वैभव शिंदे (5 लाख 29 हजार), सिध्दार्थ भिंगारदिवे (5 लाख 35 हजार), अभिजित तुपे (4 लाख 70 हजार), अतुल धोंडे (4 लाख 35 हजार), सागर अनारसे (4 लाख 35 हजार), क्ष्रफुल्ल वैराळ (4 लाख 40 हजार), प्रशांत वाघमारे (5 लाख 45 हजार), गोविंद तुपे (4 लाख 95 हजार), पायल भिंगारदिवे (6 लाख 15 हजार),संदीप शिंदे (4 लाख 24 हजार), जालींदर खेतमाळीस (7 लाख 75 हजार)अशी एकुण 71 लाख 28 हजार व फिर्यादीचे 15 लाखांची फसवणूक झाली आहे.

आरोपींनी ठाणे जिल्ह्यात सुध्दा अनेकांची फसवणुक केली आहे. पोलीसांनी लहारे याच्या घरी छापा टाकुन बनावट स्टँप पेपर, सरकारी खात्याचे लेटरहेड जप्त केले आहेत. तसेच त्याला अटकही केली आहे. फिर्यादीच्या मित्रांनाही अशाच प्रकारे फसविण्यात आले असल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या