मुंबई | Mumbai
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात पार पडलेल्या जाहीर सभेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सडेतोड भूमिका मांडली. एकीकडे मुंबई मराठी माणसाची की आणखी कुणाची? या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापले असतानाच, या वादात आता तामिळनाडूतून मुंबईत प्रचारासाठी आलेल्या भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा करत, हे शहर महाराष्ट्राचे नाही अशा आशयाचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
या पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत अण्णामलाई यांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले, “मुंबईत रसमलाई आली होती… म्हणे मुंबई आणि महाराष्ट्राचा काय संबंध? अरे भXX, तुझा काय संबंध आहे इथे यायचा?” अशा शब्दांत त्यांनी अण्णामलाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आता याच मुद्द्यावर अनामलाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
के. अण्णामलाई यांनी म्हंटले आहे की, मुंबई शहर हे केवळ महाराष्ट्रापुरते सिमीत नसून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याने महाराष्ट्रातील लोकांचे योगदान कुठेही नाकारलेले नाही, असेही अण्णामलाई म्हणाले.
नेमक काय म्हणाले अण्णमलाई?
“मला धमकी देणारे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे कोण आहेत? मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. त्या लोकांनी (ठाकरे बंधू) फक्त मला शिवीगाळ करण्यासाठी सभा बोलवली होती. मलाही माहिती नव्हते की मी त्यांच्यासाठी एवढा महत्त्वाचा बनलो आहे. कुणीतरी असे लिहिले आहे की मी मुंबईत आलो तर माझे पाय छाटून टाकतील. अशा लोकांना मी सांगतो की, मी मुंबईत येणार आहे.. माझे पाय छाटण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करून पाहा. धमक्यांना घाबरणारा असतो तर मी माझ्या गावात लपून बसलो असतो. जर मी म्हणत असेन की कामराज हे भारताचे सर्वोत्तम नेत्यांपैकी एक आहेत. तर याचा अर्थ असा होतो का की ते तमिळ राहिले नाहीत? त्याचप्रमाणे मी जर म्हणतोय की मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. तर त्याचा अर्थ असा होतो का की महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केलेली नाही?” अशा शब्दांत अण्णामलाई यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले.
अण्णामलाई यांनी काय वक्तव्य केलं होतं?
के अण्णामलाई यांनी म्हटले होते की, मोदीजी हे केंद्रामध्ये आहेत, देवेंद्रजी राज्यामध्ये आहेत आणि बॉम्बेमध्ये भाजपचा महापौर असेल. कारण बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही, ते आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट हे 75 हजार कोटी रुपये इतके आहे. चेन्नईचे बजेट हे 8 हजार कोटी तर बंगळुरुचे बजेट हे 19 हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यामुळे मुंबईचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला चांगले लोक प्रशासनात बसवावे लागतील, असे वक्तव्य त्यांनी केले होते.




