Wednesday, February 4, 2026
HomeनगरAhilyanagar : के के रेंजचे भूत पुन्हा जागे?

Ahilyanagar : के के रेंजचे भूत पुन्हा जागे?

राहुरी, नगर आणि पारनेरच्या 23 गावांचे लष्कराच्या क्षेत्र मैदानी व तोफखाना सराव प्रशिक्षणासाठी सुरक्षित क्षेत्र

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार व तोफखाना अधिनियम 1938 च्या कलम 9 च्या पोटकलम (1) व (2) नुसार जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील राहुरी, पारनेर आणि नगर तालुक्यातील एकूण 23 गावांचे क्षेत्र 15 जानेवारी 2026 ते 14 जानेवारी 2031 या कालावधीत जिवंत दारुगोळ्यासहित मैदानी व तोफखाना सराव प्रशिक्षणासाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

- Advertisement -

चार वर्षापूर्वी अचानक लष्कराच्या केके रेंजच्या विस्तारीकरणाचा विषय पेटला होता. त्यावेळी या विषयाला नगर ते दिल्लीपर्यंत विरोध करण्यात आला होता. आता सरावच्या नावाखाल पुन्हा केके रेंजचा विषय पुन्हा पुढे येण्याची शक्यता आहे. सुरक्षित क्षेत्र ही ठिकाणे विविध दिवसांसाठी व विविध लक्ष्यांसाठी सराव करण्यास निवडण्यात आली आहेत. त्यामुळे सरावातील विविधता साधता येईल व कोणत्याही विशिष्ट गावाचे किंवा गावसमूहाचे सतत स्थलांतर टाळता येईल. विनिर्दिष्ट क्षेत्रातील गावे व धोकादायक क्षेत्रे ही सरावाच्या आवश्यक दिवशीच महसूल अधिकार्‍यांमार्फत धोकादायक क्षेत्र म्हणून घोषित करून खाली करण्यात येतील. मात्र, संपूर्ण कालावधीदरम्यान कोणत्याही गावांचे स्थलांतर होणार नाही. ही कार्यवाही भूसंपादन अथवा पुनर्वसनाची नसून, यापूर्वीप्रमाणे केवळ सराव प्रशिक्षणासाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून ठेवण्याची आहे.

YouTube video player

वरील गावांमधील सर्व्हे नंबर, गट नंबर व फॉरेस्ट डिपार्टमेंट नंबरची यादी संबंधित तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालय व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी जिल्ह्याच्या ahilyanagar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिली आहे.

या गावांचा समावेश..
अहिल्यानगर तालुक्यातील देहेरे, इस्लामपूर, शिंगवे, नांदगाव, सुजलपूर व घाणेगाव या सहा गावांतील 991.27 हेक्टर खाजगी क्षेत्र, 150.85 हेक्टर सरकारी क्षेत्र व 113.11 हेक्टर वनक्षेत्र; राहुरी तालुक्यातील बाभुळगाव, जांभुळबन, जांभळी, वरवंडी, बारागाव नांदूर, कुरणवाडी, घोरपडवाडी, चिंचाळे, गडाखवाडी, ताहाराबाद, दरडगाव थडी व वावरथ या 12 गावांतील 4 हजार 130.64 हेक्टर खाजगी क्षेत्र 2 हजार 260.52 हेक्टर सरकारी क्षेत्र व 5 हजार 657.76 हेक्टर वनक्षेत्र; तसेच पारनेर तालुक्यातील वनकुटे, पळशी, वडगाव-सावताळ, गाजदीपर व ढवळपुरी या 5 गावांतील 5 हजार 677.05 हेक्टर खाजगी क्षेत्र, 1 हजार 185.74 हेक्टर सरकारी क्षेत्र व 5 हजार 452.75 हेक्टर वनक्षेत्र यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या